बीएसएनएल केबल चोरीचा पर्दाफाश

 आंतरजिल्हा टोळी जेरबंद

आधी जेसीबीने उकरले,

मग टेम्पोने पळवले;

ऑइलच्या एका थेंबाने उघड केले चोरांचे पाप

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
सरकारी मालमत्तेवर डल्ला मारणार्‍या एका हायटेक आंतरजिल्हा टोळीच्या नाशिकरोड गुन्हे शोध पथकाने अक्षरशः मुसक्या आवळल्या आहेत. भारत संचार निगम लिमिटेड कंपनीची भूमिगत केबल चोरणार्‍या या टोळीकडून पोलिसांनी तब्बल एक कोटी पाच लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. नाशिकरोड पोलिसांनी मुंबई कनेक्शन असलेल्या या टोळीकडून चोरीसाठी वापरलेला जेसीबी आणि टेम्पोदेखील जप्त करण्यात आला आहे.

पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, 30 मे रोजी रात्री 8 ते 31 मेच्या सकाळी 10 वाजेच्या दरम्यान नाशिकरोड येथील बिटको चौकातील संजय मेडिकलसमोर ही मोठी चोरी झाली होती. अज्ञात चोरांनी बीएसएनएल कंपनीचे सिमेंटचे चेंबर उघडून, आत असलेली 35 लाख रुपये किमतीची महागडी यू.जी. केबल कोणत्यातरी यंत्राच्या सहाय्याने ओढून कापून नेली होती. याप्रकरणी बीएसएनएलचे अधिकारी बाळासाहेब दत्तात्रेय कोटकर यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवण्याचे आदेश दिले होते. 1 जून रोजी रात्रीच्या वेळी सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस हवालदार विशाल पाटील, अरुण गाडेकर, महेंद्र जाधव, सागर आडणे, रोहित शिंदे, योगेश रानडे हे गुन्हे शोध पथक बिटको चौकातून लॅम रोडकडे गस्त घालत होते. त्याच वेळी एक संशयास्पद मालवाहू टेम्पो पोलिसांची गाडी पाहून वेगाने पळू लागला. पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांनी थरारक पाठलाग करून टेम्पोला आडवे पाडले. पोलीस जेव्हा टेम्पोपाशी पोहोचले, तेव्हा त्यांना टेम्पोच्या मागच्या फळ्यांमधून ऑइल गळत असल्याचे दिसले. केबल कापताना झालेल्या ऑइलच्या या खुणेने पोलिसांचा संशय
खात्रीत बदलला.
पोलीस खाक्या दाखवताच टेम्पोतील संशयितांनी पोपटासारखे बोलण्यास सुरुवात केली. टेम्पोची झडती घेतली असता, त्यात बीएसएनएल केबलचे लहान-मोठे तुकडे आढळून आले. तपासात समोर आले की, ही केबल चोरण्यासाठी चक्क एका जेसीबीचा वापर करण्यात आला होता. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला जेसीबी आणि टेम्पोसह एक कोटी पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे वाहाब अब्दुल नवाज (35, रा. भांडुप, मुंबई), सुरेश दिलीप वैराळ (37, रा. भांडुप, मुंबई), बसंतलाल राजाराम यादव (38, रा. चेंबूर, मुंबई), कमलेशकुमार सुखदेव रविदास (26, रा. नवाजा, बिहार – जेसीबीचालक) अशी असून, या चारही आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली असून, त्यांनी अशाच प्रकारे इतर कुठे गुन्हे केले आहेत का? याचा तपास पोलीस करत आहेत.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहायक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) अतुल चौधरी यांच्या नेतृत्वात ही कामगिरी करण्यात आली. या कारवाईत सपोनि प्रवीण सूर्यवंशी, हवालदार विशाल पाटील, सागर आडणे, महेंद्र जाधव, पोलीस शिपाई अरुण गाडेकर, रोहित शिंदे आणि योगेश रानडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

BSNL cable theft exposed

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *