कुंभमेळ्यासाठी पाच महत्त्वाच्या स्थानकांवर पायाभूत सुविधांच्या विकासाला गती

नाशिक रोड : विशेष प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळा-2027 च्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने नाशिक परिसरातील पाच महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर पायाभूत सुविधांच्या विकासाला गती दिली आहे. देवळाली, नाशिकरोड, ओढा, खेरवाडी आणि कसबे सुकणे या स्थानकांवर मोठ्या प्रमाणावर विकासकामे हाती घेण्यात आली आहेत.
कुंभमेळ्यादरम्यान देशभरातून लाखो भाविक रेल्वेने नाशिकमध्ये दाखल होणार असल्याने प्रवासी हाताळणी क्षमता वाढविणे, रेल्वे संचालन अधिक कार्यक्षम करणे, गर्दीचे व्यवस्थापन आणि प्रवाशांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही कामे केली जात आहेत.
याअंतर्गत अतिरिक्त प्रवासी प्लॅटफॉर्म, यार्ड पुनर्रचना, इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली, अतिरिक्त लूप व स्टेबलिंग लाइन्स, फूट ओव्हर ब्रिज, प्लॅटफॉर्म शेड, प्रतीक्षालये, पाणीपुरवठा सुविधा, स्वच्छतागृहे, सांडपाणी प्रक्रिया केंद्रे, तसेच रेल्वे कर्मचार्‍यांसाठी निवासस्थाने उभारण्यात येत आहेत.
देवळाली स्थानकावर अतिरिक्त उच्चस्तरीय प्लॅटफॉर्म, इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग, स्टेबलिंग सुविधा, फूट ओव्हर ब्रिज, होल्डिंग एरिया आणि शंभर केएलडी क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारला जात आहे. याशिवाय कर्मचारी निवासस्थाने आणि रेल्वे संचालनासाठी आवश्यक इतर सुविधांची कामेही सुरू आहेत.
नाशिकरोड स्थानकाचा विकास कुंभमेळ्यातील प्रमुख प्रवासी केंद्र म्हणून केला जात आहे. येथे नवीन फूट ओव्हर ब्रिज, विस्तारित प्लॅटफॉर्म शेड, अतिरिक्त पाणीपुरवठा व्यवस्था, स्वच्छतागृहे आणि स्थानक परिसरातील सुविधा वाढविण्यात येत आहेत. अमृतस्नानाच्या दिवशी होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन सुरक्षित हालचाल आणि गर्दी नियंत्रणावर विशेष भर दिला जात आहे.
ओढा स्थानकावर अतिरिक्त लूप लाइन्स, सहा स्टेबलिंग लाइन्स, इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग, फूट ओव्हर ब्रिज आणि होल्डिंग एरिया उभारले जात आहेत. आवश्यक जमीन संपादन प्रक्रियेलाही वेग आला आहे. खेरवाडी स्थानकावर आयलंड प्लॅटफॉर्म, अतिरिक्त स्टेबलिंग लाइन्स, फूट ओव्हर ब्रिज आणि विविध प्रवासी सुविधांची उभारणी केली जात आहे. कसबे सुकणे स्थानकावर अतिरिक्त लूप लाइन्स, स्टेबलिंग लाइन्स, प्लॅटफॉर्म विकास व प्रवासी सुविधा वाढविण्याची कामे सुरू आहेत. कुंभमेळ्यातील गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी सर्व पाच स्थानकांवर स्वतंत्र होल्डिंग एरिया विकसित केले जात आहेत.

Infrastructure development accelerated at five important stations for Kumbh Mela

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *