सिन्नर : प्रतिनिधी
खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना वाढत्या डिझेल दराने शेतकर्यांच्या अडचणीत भर घातली आहे. ट्रॅक्टरद्वारे करण्यात येणार्या मशागतीच्या विविध कामांचे दर वाढल्याने यंदा पेरणीपूर्व तयारीसाठी शेतकर्यांना अधिक खर्चाचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे आधीच वाढत्या उत्पादन खर्चाने त्रस्त असलेल्या बळीराजाचे आर्थिक गणित पुन्हा एकदा बिघडण्याची चिन्हे आहेत.
डिझेलच्या किमतीत झालेल्या वाढीचा परिणाम ट्रॅक्टर मशागतीच्या दरांवर झाला असून नांगरणी, पेरणी, रोटाव्हेटर आणि फणणी यांसारख्या कामांच्या दरात 200 ते 500 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. गेल्या वर्षी नांगरणीसाठी प्रति एकर दोन हजार ते दोन हजार 200 रुपये खर्च येत होता. तो यंदा दोन हजार 500 रुपयांवर पोहोचला आहे. सोयाबीन व इतर पारंपरिक पिकांच्या पेरणीसाठी एक हजार 500 रुपये, तर मका पेरणीसाठी एक हजार 600 ते एक हजार 800 रुपये दर आकारले जाणार आहेत.
रोटाव्हेटरच्या कामासाठी प्रतिएकर दोन हजार 500 रुपये, तर फणणी अथवा पाळीसाठी एक हजार 200 रुपये खर्च येत आहे. जेसीबीच्या कामाचे दरही प्रतितास एक हजार रुपयांवरून एक हजार 200 रुपयांपर्यंत वाढले आहेत. सध्याच्या डिझेल दरानुसार हे नवीन दर निश्चित करण्यात आले असल्याचे ट्रॅक्टर चालकांनी सांगितले.
दरम्यान, मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा करत असलेल्या शेतकर्यांसमोर उत्पादन खर्च वाढीचे नवे संकट उभे राहिले आहे. बियाणे, खते, औषधे आणि मशागतीचा वाढता खर्च यामुळे शेती परवडणे कठीण होत असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. भविष्यात इंधन दर आणखी वाढल्यास मशागतीचे दरही वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गेल्या वर्षीचा दर (रुपये) यंदाचा दर (रुपये) वाढ (रुपये)
नांगरणी – 2000 ते 2200 2500 300 ते 500
पारंपरिक पिके/सोयाबीन पेरणी
1200 1500 300
मका पेरणी
1400 1600 ते 1800 200 ते 400
रोटाव्हेटर
2000 2500 500
फणणी/पाळी
1000 1200 200
जेसीबी (प्रतितास)
1000 1200 200
Fuel price hike hits Baliraja; Tractor tillage prices increase