बिनशर्त पाठिंब्यासाठी मंत्री सामंत नाशकात
नाशिक : प्रतिनिधी
माघारीच्या हाय व्होल्टेज ड्राम्यानंतर नाशिक विधान परिषद निवडणुकीत रंगत चढायला सुरुवात झाली आहे. अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी माघार घ्यावी, याकरिता सेनेचे मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे संपर्कमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी नाशकात धाव घेत गोकुळ गितेंच्या माघारीसाठी प्रयत्न सुरूच ठेवले. तसेच माध्यम प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी आपण आशावादी असल्याचे सांगितले.
अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. या सर्व नाट्यमय घडामोडींवर मंत्री उदय सामंत यांनी महायुतीची भूमिका स्पष्ट केली आहे. नाशिकमध्ये गणेश गितेंचा अर्ज मागे घेतला आहे. दोन अर्ज शिल्लक आहेत. गोकुळ गिते, प्रसाद हिरे यांचा अर्ज आहे. मी प्रसाद हिरेंशी दोन वेळा बोललो आहे. प्रसाद हिरे यांना दादा भुसे भेटतील. गोकुळ गितेंशी मी बोललो आहे, त्यांना विनंती केली आहे. गिरीश महाजन हेदेखील नाशिकमध्ये आहेत. गिरीश महाजन त्यांची भेट घेतील. मी प्रचंड आशावादी आहे. गोकुळ गिते माघार घेतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
गोकुळ गिते यांनी मी भाजपचा बंडखोर नाही. माझ्यावर दबाव आणू नका, असे वक्तव्य केले. याबाबत विचारले असता उदय सामंत म्हणाले की, आम्ही दबाव आणत नाही. आम्ही सन्मानपूर्वक विनंती केली आहे. गिरीश महाजन आणि माझ्या विनंतीला ते मान देतील. राजकारणामध्ये समज-गैरसमज होत असतात. त्यामुळे योग्य तो निर्णय होईल. कुणाल दराडे यांनी खुलासा केलेला आहे की, त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य केलेले नाही. अनवधानाने जर गितेंचा गैरसमज झाला असेल तर कुणाल दराडे दिलगिरी व्यक्त करतील. पण मी कुणाल दराडे यांना विचारले तेव्हा त्यांनी मला सांगितले की, साहेब, मी असे काहीही बोललेलो नाही. हे काहीतरी गैरसमजातून झालेले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
नाशिकमुळे जळगावमध्ये सेनेची बंडखोरी
गोकुळ गिते यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यामुळे महायुतीला मोठा हादरा बसला. दरम्यान, नाशिकमध्ये गोकुळ गिते यांनी शिंदेसेनेच्या उमेदवारासमोर उमेदवारी कायम ठेवल्याने याची परतफेड करण्यासाठी जळगावमध्ये शिंदेसेनेने भाजपसमोर बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनीही अर्ज कायम ठेवल्याची जोरदार चर्चा आहे.
Gokul Geeta creates panic in Shinde Sena