हजारोंचा दंड, कामे लवकर करण्याच्या सूचना
नाशिक : प्रतिनिधी
शहराचा वाढता विस्तार आणि आगामी कुंभमेळ्याला होणारी भाविक, पर्यटक तसेच साधू-महंतांची गर्दी पाहता महापालिकेने शहरातील प्रमुख रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत. दरम्यान, चार दिवसांपूर्वी आलेल्या मान्सूनपूर्व पावसाने महापालिकेचे पितळ उघड झाले होते. दरम्यान, रस्त्यांची कामे कासवगतीने केल्याने महापालिकेने चार ठेकेदारांना दणका दिला आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेल्या रस्ते विकासकामांमुळे नाशिककरांना सध्या अनेक गैरसोयींना तोंड द्यावे लागत आहे. मनपा प्रशासनाकडून त्यावर उपाययोजना करून नागरिकांची गैरसोय कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याप्रकरणी पेनल्टी फॉर डिले इन वर्क या कारणाखाली चार ठेकेदारांना दंड ठोठावण्यात आला आहे. त्यात सातपूर-अंबड लिंकरोड आणि दिंडोरी रोडचे काम करणार्या एसबीडी इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदार कंपनीला दिवसाला 91 हजार रुपये दंड आकारला जात आहे. मखमलाबाद रोडचे काम करणार्या महालक्ष्मी इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदार कंपनीला दररोज दहा हजारांंचा दंड आकारला जात असल्याचे शहर अभियंता संजय अग्रवाल यांनी सांगितले. बांधकाम विभागाने आतापर्यंत दोन वेळा नोटीस बजावून कामांविषयी तंबी दिली आहे. असे असताना संबंधित काही ठेकेदारांकडून त्यास प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर मनपाच्या बांधकाम विभागाने चार ठेकेदारांना आर्थिक दंड आकारण्याची कारवाई सुरू
केली आहे.
त्याचबरोबर अन्य दोन ठेकेदारांना दररोज एक हजार रुपये इतक्या दंडाची आकारणी केली जात आहे. दुसरीकडे, रस्तेकामांमध्ये हलगर्जीपणा करून कामांना विलंब करणार्या चार ठेकेदारांना महापालिकेच्या बांधकाम विभागाने दररोज हजारो रुपयांचा दंड आकारण्याची कारवाई सुरू
केली आहे.
महापालिका व पोलीस आयुक्त कार्यालयाने महत्त्वाच्या जवळपास साठ रस्त्यांची यादी तयार करून ती मंजुरीसाठी सिंहस्थ कुंभमेळा विकास प्राधिकरणाकडे सादर केली होती. निधीची उपलब्धता आणि आवश्यक असलेल्या रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देत प्राधिकरणाने 29 रस्त्यांच्या कामांना मंजुरी दिली आहे. त्यानुसार ही कामे चार महिन्यांपासून सुरू आहेत. अनेक कामांचा वेग समाधानकारक असला, तरी काही ठेकेदारांकडून मात्र कामांना विलंब होत असल्याने त्याचा फटका नाशिककरांना दररोज बसत आहे. कामे वेळीच व गुणवत्तापूर्ण करण्याबाबत मनपा प्रशासनाने निर्देश दिले आहेत.
रस्तेकामासंदर्भात अनेकदा सूचना करूनही कामांत विलंब झाल्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार दंड आकारला जात आहे. याप्रकरणी चार ठेकेदारांवर कारवाई करण्यात आली आहे.
– संजय अग्रवाल, शहर अभियंता, मनपा
Road works slow down; Four contractors hit