सौर कृषिपंपांमध्ये महाराष्ट्राची विक्रमी झेप

देशात सर्वाधिक 10 लाखांचा टप्पा गाठला

नाशिक : प्रतिनिधी
सौर कृषिपंपांमध्ये विश्वविक्रम करणार्‍या महाराष्ट्राने सर्वाधिक 10 लाख सौर कृषिपंपांचा टप्पा पूर्ण करत देशपातळीवर एक नवा इतिहास रचला आहे.
पीएम कुसुम-बी व मागेल त्याला सौर कृषिपंप अंतर्गत महाराष्ट्राने ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. देशातील एकूण सौर कृषिपंपांपैकी तब्बल 64 टक्के सौरपंप एकट्या महाराष्ट्रात कार्यान्वित
झाले आहेत.
प्रधानमंत्री कुसुम-बी आणि राज्य शासनाच्या मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेची महावितरणकडून प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला तसेच महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या नेतृत्वात महावितरणने सौर कृषिपंपांमध्ये मोठी आघाडी घेतली आहे.
देशात आतापर्यंत एकूण 15 लाख 62 हजार 289 सौर कृषिपंप कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्यापैकी तब्बल 10 लाख 472 (64 टक्के) एकट्या महाराष्ट्रात तर उर्वरित सर्व राज्यांमध्ये एकूण 5 लाख 61 हजार 817 (34 टक्के) कृषिपंप कार्यान्वित झाले आहेत. महाराष्ट्रानंतर हरियाणा- 1 लाख 90 हजार, राजस्थान- 1 लाख 27 हजार, उत्तर प्रदेश- 71 हजार 538, झारखंड- 61 हजार 452, गुजरात- 21 हजार 894 अशी क्रमवारी आहे. याआधी महाराष्ट्राने महावितरणच्या माध्यमातून मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेत एकाच महिन्यात तब्बल 45 हजार 911 सौर कृषिपंप कार्यान्वित करण्याची विश्वविक्रमी कामगिरी केली आहे. त्याची नोंद डिसेंबर 2025 मध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे.
मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेमध्ये सर्वसाधारण शेतकर्‍यांना केवळ 10 टक्के आणि अनुसूचित जाती-जमाती शेतकर्‍यांसाठी केवळ 5 टक्के लाभार्थी हिस्स्यावर तीन, पाच व 7.5 अश्वशक्तीचे सौर कृषिपंप देण्यात येत आहेत. सौरपंपांच्या पॅनेल्समधून 25 वर्षे वीजनिर्मिती होते. त्यामुळे आतापर्यंत 10 लाखांवर शेतकर्‍यांची वीजबिलांमधून मुक्तता झाली आहे.
या योजनेतील प्रत्येक सौरपंपाला पाच वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे. या कालावधीत देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी पुरवठादार एजन्सीवर बंधनकारक आहे. तसेच सोलर पॅनेल्स आणि पंपाचे नुकसान, नैसर्गिक आपत्ती तसेच चोरीविरोधी विमा संरक्षणही उपलब्ध आहे.

Maharashtra’s record leap in solar agricultural pumps

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *