मुंबई नाका परिसरात ‘नंदिनी’ची स्वच्छता मोहीम
सिडको : प्रतिनिधी
नाशिक :
गोदावरीनंतर नाशिकची दुसरी नदी असलेल्या नंदिनीच्या स्वच्छतेसाठी काल जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मोहीम राबविण्यात आली. महापालिकेबरोबरच समाजसेवी संस्थांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन ‘नंदिनी’तील केरकचरा काढत नदी स्वच्छ केली. नरेंद्राचार्य महाराजांच्या अनुयायांसह शहरातील पर्यावरणप्रेमी नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘सुंदर नाशिक’ अभियानांतर्गत नंदिनी नदी स्वच्छता मोहीम उत्साहात राबविण्यात आली. कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकारातून आयोजित या उपक्रमात विविध सामाजिक, धार्मिक आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
अभियानाच्या प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत पूजन करण्यात आले. त्यानंतर मुंबई नाका ते नासर्डी पूल यादरम्यान वाहणार्या नंदिनी नदीच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. नदीपात्र आणि परिसरातील कचरा हटवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
या उपक्रमात सेवेकरी, शिष्य, साधक, युवा कार्यकर्ते तसेच पर्यावरणप्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. नदी स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षणासाठी समाजाच्या सर्व घटकांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले.
कार्यक्रमास महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे, प्रभाग सभापती मंगला नन्नावरे, गटनेते श्याम बडोदे, नगरसेविका रूपाली निकुळे, नगरसेवक चंद्रकांत खोडे, माजी नगरसेवक यशवंत निकुळे, सुनील खोडे, प्रकाश नन्नावरे, सरचिटणीस सुनील देसाई, मंडळ अध्यक्ष उदय जोशी, बापू यशोद, गणपत वारडे, सचिन नन्नावरे, सुनील निकम, संकेत खोडे, निखिल खोडे, स्वाती वाटारे, सोनाली कुलकर्णी यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते
उपस्थित होते.
जि. प. कर्मचार्यांचा सहभाग
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नाशिक महानगरपालिका व उन्नत नाशिक अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या नंदिनी नदी स्वच्छता महाअभियानात जिल्हा परिषद नाशिकच्या अधिकारी-कर्मचार्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. नंदिनी नदी परिसरात स्वच्छता करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) महेश पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मारुती मुळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पावस्व) दीपक पाटील, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) साईलता सामलेटी, गटविकास अधिकारी (मनरेगा) सतीश धस, सहायक प्रशासन अधिकारी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘स्वच्छ नदी, स्वच्छ पर्यावरण आणि निरोगी जीवन’ या संकल्पनेतून नदीपात्रातील प्लास्टिक कचरा व इतर घनकचरा हटवून स्वच्छता करण्यात आली. पर्यावरण संरक्षण, जलस्रोत संवर्धन आणि स्वच्छतेबाबत जनजागृतीसाठी आयोजित या उपक्रमातून वृक्षारोपण, प्लास्टिकमुक्त परिसर व जलस्रोत संरक्षणाचा संदेशही देण्यात आला.
सिडकोतील शेकडो स्वयंसेवकांचा सहभाग
मुंबई नाका ते नासर्डी पूल यादरम्यान स्वच्छता मोहिमेदरम्यान मोठ्या प्रमाणात कचरा संकलित करण्यात आला. गोळा केलेला कचरा घंटागाड्यांच्या माध्यमातून खत प्रकल्पाकडे पाठविण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांची उपस्थिती विशेष लक्षणीय होती. या महास्वच्छता अभियानात माजी नगरसेविका हर्षा बडगुजर, नगरसेविका साधना मटाले, योगिता हिरे, हर्षदा गायकर, प्रभाग सभापती बाळकृष्ण शिरसाठ, शरद फडोळ, राकेश दोंदे, पवन मटाले, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड, स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे यांच्यासह सिडको परिसरातील तसेच राज्याच्या विविध भागांतून आलेल्या स्वयंसेवी संस्था व संघटनांच्या स्वयंसेवकांनी सहभाग नोंदविला.
Everyone unites to clean the Nandini River!