मोबाइल स्नॅचिंग प्रकरणाचा पर्दाफाश

21 मोबाइल, 5 मोटारसायकली जप्त; गंगापूर पोलिसांची कारवाई

नाशिक : प्रतिनिधी
गंगापूर पोलिसांनी मोबाइल हिसकावून चोरी करणार्‍या टोळीचा पर्दाफाश करत दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून 21 मोबाइल फोन व 5 चोरीच्या मोटारसायकलींसह सुमारे 6 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे मोबाइल स्नॅचिंग व वाहनचोरीचे एकूण सात गुन्हे उघडकीस आले आहेत.
2 मे रोजी दुपारच्या सुमारास गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वसंतराव पवार चौक ते दत्त चौक, डी. के. नगर मार्गावर एक व्यक्ती पायी जात असताना निळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकलवरून आलेल्या दोन युवकांनी त्यांच्या हातातील मोबाइल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला होता. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात
आला होता.
गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे यांनी आरोपींचा तातडीने शोध घेण्याचे आदेश दिले. गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला. पोलीस अंमलदार सुजित जाधव यांनी फुटेजमधील संशयिताची ओळख रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार ज्ञानेश्वर उर्फ नन्या मोतीराम दिवे (रा. गोवर्धनगाव, नाशिक) अशी पटवून दिली. त्यानंतर पोलिसांनी त्र्यंबकेश्वर, घोटी, इगतपुरी परिसरात शोधमोहीम राबविली. यादरम्यान दुसरा संशयित गोवर्धन उर्फ गौरव गोपाळ शेवरे (वय 20, रा. हातरुंडी, ता. पेठ) याला ताब्यात घेण्यात आले. पुढील तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ज्ञानेश्वर दिवे हा गंगापूर शिवारातील पाटील वस्ती परिसरात येणार असल्याचे समजताच पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.
चौकशीदरम्यान दोन्ही आरोपींनी मोटारसायकलवरून फिरत पादचार्‍यांचे मोबाइल हिसकावल्याची कबुली दिली. सखोल चौकशीतून त्यांच्या ताब्यातून 21 मोबाइल फोन आणि ठाणे जिल्हा, निफाड, सातपूर, अंबड व गोवर्धनगाव परिसरातून चोरी केलेल्या हश; मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. या कारवाईमुळे मोबाइल स्नॅचिंगचे 2 आणि मोटारसायकल चोरीचे 5 असे एकूण 7 गुन्हे उघडकीस आले असून, सुमारे 6 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर सुराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे तसेच गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी केली. पुढील तपास पोलीस हवालदार गिरीश महाले करीत आहेत.

Mobile snatching case exposed

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *