अतिदुर्गम भागात ड्रोनद्वारे आरोग्यसेवेची यशस्वी चाचणी

डोंगरदर्‍या अन् नद्यांच्या पुरावर मात करत 20 ते 25 गावांना मिळणार औषधोपचार

सुरगाणा : प्रतिनिधी
तालुक्यातील दुर्गम, अतिदुर्गम आणि सीमावर्ती भागातील नागरिकांना वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन, तालुका आरोग्य विभाग आणि आयआयटी मुंबई यांच्या तांत्रिक सहकार्याने एक क्रांतिकारी पाऊल उचलण्यात आले आहे.
पावसाळ्यात संपर्क तुटणार्‍या आव्हानात्मक भागांसाठी सुरू केलेल्या ड्रोनद्वारे आरोग्य सेवा वितरण प्रकल्पाची पहिली यशस्वी चाचणी नुकतीच तज्ज्ञांच्या टीमकडून घेण्यात आली. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे आदिवासी समाजबांधवांच्या आरोग्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
सुरगाणा तालुक्यातील खिर्डी, भाटी, पिंपळसोंड हा भाग भौगोलिकदृष्ट्या अडचणीचा, डोंगरदर्‍या आणि घाटवळणाचा आहे.
पावसाळ्यात येथील रस्त्यांवर दरडी कोसळणे, फरशी पुलांवरून पुराचे पाणी वाहणे यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटतो. अशा वेळी सर्पदंश, अपघात किंवा इतर वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. यावर मात करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र अंबोडे ते खिर्डी, भाटी आणि उंबरठाण, पांगारणे ते पिंपळसोंड, उंबरपाडा, तातापाणी अशा सुमारे 10 ते 12 किलोमीटर अंतराच्या मार्गावर ही ड्रोन चाचणी घेण्यात आली. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे परिसरातील सुमारे 20 ते 25 गावांमधील 25 ते 30 हजार नागरिकांना थेट दिलासा मिळणार आहे. औषधे, लसी, वैद्यकीय साहित्य तसेच प्रयोगशाळा तपासणीसाठी आवश्यक नमुने अल्पावधीत पोहोचवणे शक्य
होणार आहे.

‘पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे अनेक गावांचा संपर्क तालुक्याशी तुटतो. शासनाने या ड्रोन उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी केल्यास दुर्गम भागातील नागरिकांना वेळेत आरोग्य सेवा मिळण्यास मोठी मदत होईल.”
– डॉ. कश्मिरा संखे, सहायक जिल्हाधिकारी, कळवण

Successful trial of healthcare through drones in remote areas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *