ओमान करारामुळे कांद्याला नवी बाजारपेठ

शेतकरी, निर्यातदारांना दिलासा; शंभर टक्के शुल्कमुक्त प्रवेश

लासलगाव : वार्ताहर
नाशिक आणि निफाड तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी तसेच निर्यातदारांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारत आणि ओमान यांच्यातील सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार 1 जून 2026 पासून लागू झाला असून, या करारांतर्गत भारतीय शेतीमालाला, विशेषतः कांद्याला ओमानच्या बाजारपेठेत 100 टक्के शुल्कमुक्त (झीरो ड्युटी) प्रवेश मिळाला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील कांद्याच्या निर्यातीस नवी संजीवनी मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
या करारामुळे भारतीय कांदा ओमानच्या बाजारपेठेत इतर देशांच्या तुलनेत अधिक स्पर्धात्मक दरात उपलब्ध होणार आहे. परिणामी, ओमानमधील आयातदारांची भारतीय कांद्याला अधिक पसंती मिळण्याची शक्यता असून, त्याचा थेट फायदा नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आणि निर्यातदारांना
होणार आहे.
सध्या आखाती देशांकडे माल पाठविताना समुद्री वाहतुकीसंदर्भातील विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, ओमानची प्रमुख बंदरे थेट अरबी समुद्रालगत असल्याने मुंबई बंदरातून रवाना झालेला कांद्याचा माल अवघ्या 48 तासांत ओमानमध्ये पोहोचू शकतो. त्यामुळे वाहतूक खर्चात बचत होण्याबरोबरच मालाची गुणवत्ता टिकवून ठेवण्यास मदत होणार आहे. नाशिक जिल्हा देशातील सर्वांत मोठा कांदा उत्पादक पट्टा म्हणून ओळखला जातो. विशेषतः लासलगाव, निफाड, येवला, चांदवड आणि सिन्नर परिसरातील लाल व उन्हाळी कांद्याची गुणवत्ता देश-विदेशात प्रसिद्ध आहे. केंद्र सरकारने यापूर्वी कांद्यावरील 20 टक्के निर्यातशुल्क आणि किमान निर्यातमूल्य रद्द केल्यानंतर निर्यातीस चालना मिळाली होती. आता ओमानबरोबरच्या या नव्या करारामुळे निर्यातीस आणखी गती मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.कांदा बाजारातील जाणकारांच्या मते, ओमानची बाजारपेठ खुली झाल्यामुळे निर्यातीची मागणी वाढेल आणि त्याचा सकारात्मक परिणाम स्थानिक बाजारभावांवरही होऊ शकतो. त्यामुळे आगामी हंगामात कांदा उत्पादक शेतकर्‍यांना अधिक चांगला दर मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

कांदा उत्पादकांसाठी कराराचे फायदे…

ओमानमध्ये भारतीय कांद्याला 100 टक्के शुल्कमुक्त प्रवेश निर्यात खर्चात मोठी बचत होणार आहे. मुंबई-ओमान समुद्री मार्गाने अवघ्या 48 तासांत माल पोहोचणार आहे. नाशिकच्या कांद्याला नवी आणि स्थिर बाजारपेठ, निर्यात वाढल्यास स्थानिक बाजारभावांना आधार मिळणार असून, शेतकरी आणि निर्यातदारांना दीर्घकालीन फायदा होण्याची शक्यता आहे.

Oman deal opens new market for onions

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *