अभिनेते गिरीश कुलकर्णी यांच्या सद्यस्थितीबाबतच्या आत्मचिंतनाचा सर्वांनी विचार करावा

– मुकुंद बाविस्कर

आत्मचिंतन म्हणजे स्वतःच्याच विचारांचा, भावनांचा, कृतींचा आणि अनुभवांचा सखोल आणि प्रामाणिकपणे घेतलेला शोध होय. सोप्या शब्दांत सांगायचं तर, स्वतःच्याच आत डोकावून स्वतःला ओळखण्याची प्रक्रिया म्हणजे आत्मचिंतन असते. आपण काय करतोय, का करतोय आणि जे करतोय ते योग्य आहे की नाही, याचा तटस्थपणे विचार करणे. यामध्ये स्वतःच्या चुका मान्य करणे आणि स्वतःच्या चांगल्या गुणांचे कौतुक करणे, या दोन्ही गोष्टी येतात. आपल्याला विशिष्ट प्रसंगी राग, आनंद, दुःख किंवा भीती का वाटली? त्या भावनांमागे काय कारण होते? हे समजून घेणे. यामुळे भावनिक समतोल राखणे सोपे जाते. अशाप्रकारे सांस्कृतिक, सामाजिक आणि सर्वच क्षेत्रांत आत्मचिंतन करण्याची आवश्यकता ज्येष्ठ अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनी एकप्रकारे व्यक्त केली.

निमित्त ठरले अर्थात शिक्षणतज्ज्ञ भावना भार्गवे स्मृती व्याख्यानमालेचे. आज कोणाचा एकेरी उल्लेख झाला तरी लगेच भावना दुखावून लोक लाठ्याकाठ्या घेतात. समाजातील सहिष्णुता, सहृदयता हरवली आहे. त्यामुळे नवीन संहिता लिहिणे अशक्य झाले आहे, अशा शब्दांत प्रसिद्ध अभिनेते, लेखक व दिग्दर्शक गिरीश कुलकर्णी यांनी खंत व्यक्त केली. शिक्षणतज्ज्ञ भावना भार्गवे स्मृती व्याख्यानमालेत कुलकर्णी बोलत होते. शंकराचार्य न्यास सभागृहात हा कार्यक्रम झाला. कुलकर्णी यांनी कधी नर्मविनोदी शैलीत, तर कधी गंभीरपणे सद्यस्थितीविषयीचे आत्मचिंतन श्रोत्यांसमोर मांडले, ते म्हणाले, सध्या माहितीचा भडिमार सुरू आहे. आयुष्य जगताना आपण गाठीशी काय बांधत आहोत, याचा विचार करावा. दुसरीकडे नकोशा स्मृती इतरांना दूर करण्यासाठी जागवल्या जात आहेत. अशा परिस्थितीत नव्याने लिहिता येणार नाही, कारण त्यानंतर कोणाच्या तरी भावना दुखावल्या जातील, अशी भीती वाटते.
तंबाखूमुक्त जीवनासाठी सायकल रॅली
तंबाखू आणि धूम्रपानाच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करण्यासाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. गोल्फ क्लब मैदानावरून पहाटे साडेसहा वाजता रॅलीला प्रारंभ झाला. आयएमए नाशिक आणि नाशिक सायकलिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या उपक्रमाला नागरिकांचा
उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वाहतूक विभागाचे उपायुक्त चंद्रकांत गवळी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. रॅलीमध्ये डॉक्टर व सायकलप्रेमींनी सहभाग घेतला.
पर्यावरण संरक्षणाचा जागर
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी शुक्रवारी रॅली व पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण, नाशिक महापालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि हरितकुंभ समन्वय समिती यांच्यातर्फे हा कार्यक्रम झाला. पंचवटीतील नाग चौक येथून सुरू झालेल्या रॅलीत विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवक, विद्यार्थी, नागरिक व पर्यावरणप्रेमींनी
उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी पर्यावरण भविष्य वाचवा, घडवा, तसेच गोदावरी नदी प्रदूषणमुक्त करा, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. प्रबोधनपर फलकही लक्षवेधी ठरले. नाग चौक ते काळाराम मंदिर या मार्गावर काढण्यात आलेल्या रॅलीतून पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, जलसंधारण आणि प्लास्टिकमुक्तीचा संदेश देण्यात आला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी विद्यासागर किल्लेदार व उपप्रादेशिक अधिकारी प्रणव पाखले यांनी पर्यावरणाचे महत्त्व सांगितले. रॅलीनंतर सीतागुंफा परिसरात दिल्ली पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण विषयावरील प्रभावी पथनाट्य सादर केले.
नाशिक वनराईचा दशकपूर्ती सोहळा
गंगापूररोड जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नाशिक वनराईचा दशकपूर्ती सोहळा म्हसरूळजवळील वनविभागाच्या डेपो येथे पार पडला. आपलं पर्यावरण संस्थेच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक नागरिक घरून पाणी घेऊन आले. तसेच काही नागरिकांनी एक किलो ते पंचवीस किलोपर्यंत गांडूळ खत, कंपोस्ट खत, निम खत आदी विविध प्रकारची सेंद्रिय खते आणून वनराईतील वृक्षांना अर्पण केली. यामुळे वृक्षसंवर्धनाचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला. उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर, सहायक उपवनसंरक्षक कल्पना वाघेरे, सहायक उपवनसंरक्षक प्रशांत खैरनार आदी उपस्थित होते.
वेदभूषण ज्योतिष प्रतिष्ठानचा पदवीदान सोहळा
वेदभूषण ज्योतिष प्रतिष्ठानतर्फे आयोजित राज्यस्तरीय ज्योतिष अधिवेशन, भूषणम् पुरस्कार सोहळा आणि पदवीदान समारंभ गंगापूररोड येथील शंकराचार्य संकुलात उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात डॉ. नरेंद्र सहस्रबुद्धे यांना वास्तुभूषण, तर दीपक वाघ यांना ज्योतिष भूषण पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. अधिवेशनाचे उद्घाटन ज्योतिषाचार्य लक्ष्मीकांत जोशी यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात विविध विषयांवरील मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित करण्यात आली. वेदभूषण ज्योतिष प्रतिष्ठानचा उच्चस्तरीय ज्योतिष भूषण अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या 66 विद्यार्थ्यांना ज्योतिष भूषण पदवी प्रदान करण्यात आली. इतर विविध अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या 177 विद्यार्थ्यांना ज्योतिष प्रबोध, ज्योतिष विशारद, ज्योतिष प्रवीण आणि कृष्णमूर्ती विशारद या पदव्या देऊन गौरविण्यात आले.
बेस्ट ऑफ गुलजार मैफल
आनेवाला पल जानेवाला हैं, यारा सिली सिली, नाम गुम जायेगा, तुझसे नाराज नहीं जिंदगी, आपकी आँखों में यांसारखी प्रख्यात गीतकार, शायर गुलजार यांनी लिहिलेली गाजलेली गाणी, रसिकांना चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळात घेऊन गेली. बाबा थिएटर्सच्या वतीने बेस्ट ऑफ गुलजार ही चित्रपटगीतांची मैफल नुकतीच रंगली. शंकराचार्य संकुल येथे झालेल्या या कार्यक्रमाची संकल्पना प्रशांत जुन्नरे यांची होती, तर प्रस्तुती नाशिक जिल्हा ऑर्केस्ट्रा असोसिएशनची होती. रुके रुके से कदम या गीताने मैफलीला प्रारंभ झाला. त्यानंतर सादर इखलेल्या तेरे बिना जिंदगी से, हुजूर इस कदर भी, तेरे बिना जिया जाये ना, ऐ जिंदगी गले लगाले या गीताने रसिक
मंत्रमुग्ध झाले.
अहिल्यादेवी होळकरांचा जयंती सोहळा
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त रामकुंड व अहिल्या घाट येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा समितीतर्फे कार्यक्रम घेण्यात आला. अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पवित्र नर्मदेच्या जलाने अभिषेक करण्यात आला. होळकर राजघराण्याचे उत्तराधिकारी यशवंतराव होळकर महाराज (तृतीय) यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे देशभरातील अहिल्यादेवी स्मारकांसाठी पाठविण्यात येणार्‍या नर्मदा कलशांपैकी नाशिकसाठी प्राप्त झालेल्या कलशाचे विधिवत पूजन करण्यात आले. याप्रसंगी होळकर घराण्याचे वंशज मुकुंदराजे होळकर, उपमहापौर विलास शिंदे, शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, राजेंद्र बागूल यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते नर्मदा कलशपूजन व जलाभिषेक करण्यात आला.
स्वरसाधना सुरांत श्रोते तल्लीन
वैरागकर संगीत प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित स्वरसाधना मासिक सभेचे सत्तरावे पुष्प नुकतेच शालिमार येथील सारडा कन्या विद्यामंदिरात अत्यंत दिमाखात पार पडले. या मैफलीत पं. अविराज तायडे व गानमहर्षी पं. उल्हास कशाळकर यांचे पट्टशिष्य आरोह ओक यांच्या शास्त्रीय गायनाने नाशिकच्या कानसेनांना मंत्रमुग्ध केले. आरोह ओक यांनी मैफलीची सुरुवात राग पुरियाने केली. यात त्यांनी विलंबित एक तालातील पिया गुणवंत ताल ही बंदिश आणि दूत तीन तालातील मैं मिल आई अपने पिया से ही बंदिश अतिशय संथ आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडली. यानंतर घराण्याच्या परंपरेप्रमाणे त्यांनी राग बहार गायला.
‘शिवशंभू गाथा’ गीतांतून उलगडली
मेलोडीयस कराओके क्लब आयोजित व सुरोहित म्युझिक प्रस्तुत शिवशंभू गाथा हा विनामूल्य कार्यक्रम गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात झाला. रोहित पाटील लिखित या गाथेचे संगीत संयोजनदेखील त्यांचेच होते. इंडियन आयडॉल सोनी टीव्हीवरील गायक सागर म्हात्रे, गौरव महाराष्ट्राचा या कलर्स मराठी वाहिनीवरचा महाविजेता वैभव थोरवे आणि एकच राजा इथे जन्मला फेम रोहित पाटील या तिन्ही गायकांना प्रथमच एकत्र ऐकण्याची संधी मिळाली. उपस्थित रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. शिवशंभू गाथा अनुभवण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. छोट्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी दाद दिली. शिवप्रेमाचा अभिमान मनात जागवत शिवरायांच्या जयघोषाने सभागृह दुमदुमून गेले. गायिका सानिया जांभेकर व पूजा म्हात्रे यांनी सुरेल सहगायन केले.
‘गंध महाराष्ट्राचा, सूर लोकगीतांचा’ मैफल
पहाटेच्या भूपाळीपासून सुरुवात केलेल्या मैफलीने लोकगीतांतून महाराष्ट्राचा अस्सल गंध पोहोचवला. सूर व संगीताच्या मिलाफाने रसिक श्रोत्यांना सुरेल अनुभूती मिळाली. प्रभात गीते, ओव्या, अभंग, भारूड, पिंगळा, वासुदेव, पोवाडा, लावणी, कोळीगीते, अहिराणी गाणे
स्फूर्ती गीते.. अशा विविध प्रकारच्या गाण्यांची निवड रसिकांना भावली. लोकप्रिय गायक, संगीतकार नंदकुमार देशपांडे यांच्या सरगम थिएटर्सतर्फे परशुराम सायखेडकर नाट्यगृहात झालेल्या या विनामूल्य कार्यक्रमात पोवाडा, लावणी, भारुड, गोंधळ आणि कोळीगीतांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कलावैभवाचे दर्शन घडवले. गायकांनी गायनातून लोककलेचा अविष्कार सादर केला. वाद्यवृंदांसोबत हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.
गीतरचनावर प्रा. डॉ. चांदवडकर यांचे व्याख्यान
निसर्गाचा भरभरून सहवास लाभलेल्या रानकवी ना. धों. महानोर यांची गाणी वास्तवतेचा अंगीकार करणारी आहेत. त्यांच्या गीतांमध्ये निसर्गाबरोबरच मानवी मूल्यांची प्राधान्याने जोपासना दिसून येते, असे प्रतिपादन प्रसिद्ध समीक्षक डॉ. तुषार चांदवडकर यांनी केले. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते महानोरांची गीतरचना या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक सुहास टिपरे होते. डॉ. चांदवडकर पुढे म्हणाले की, कविता नुसती आवडणारी नसावी तर ती भावणारीही असली पाहिजे. ना. धों. महानोरांनी लिहिलेल्या गीतांमुळे चित्रपटांना यश मिळाले. जैत रे जैत, एक होता विदूषक, सर्जा, मुक्ता अशा अनेक चित्रपटांची गाणी लिहिताना निसर्ग आणि वास्तव चितारल्याने या गाण्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य केले.

Everyone should consider actor Girish Kulkarni’s introspection on his current situation.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *