इंडिया आघाडीत एकजुटीचे दर्शन

केंद्र सरकारला घेरण्यासाठी पाच महत्त्वाचे ठराव एकमताने मंजूर

नवी दिल्ली : प्रतिनिधी
काही राजकीय मतभेद आणि अंतर्गत नाराजीच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये ’इंडिया’आघाडीची बहुचर्चित बैठक अखेर यशस्वीरीत्या पार पडली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत राहुल गांधी, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी यांच्यासह विरोधी पक्षांचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.
या बैठकीत आगामी राजकीय रणनीतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.संसदेत आणि रस्त्यावर सरकारला घेरण्यासाठी पाच अत्यंत महत्त्वाचे ठराव एकमताने मंजूर करण्यात आले आहेत. यात मुख्यत: ’नीट’ घोटाळ्यात केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनामा आणि एसआयआर, ’मतचोरी’प्रकरणी सरन्यायाधीशांना पत्र लिहिण्याचा समावेश
आहे.
द्रमुकचा बहिष्कार आणि काही नेत्यांच्या नाराजीच्या चर्चांदरम्यान, या पाच ठरावांमधून ’इंडिया’ आघाडीने आगामी काळात केंद्र सरकारविरोधात एकजुटीने आणि आक्रमकपणे लढा देण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
बैठकीनंतर खरगे यांनी पत्रकार परिषदेत या पाच ठरावांची अधिकृत घोषणा केली.

1 सरन्यायाधीशांना पत्र
निवडणूक प्रक्रियेतील ’स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन’ (एसआयआर) आणि निवडणुकीत कथितरीत्या होणारी ’मतांची चोरी’ या अत्यंत गंभीर मुद्द्यांवर लक्ष वेधण्यासाठी आघाडीकडून थेट सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना पत्र पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

2 शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
देशभरात खळबळ उडवून देणार्‍या आणि लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणार्‍या ’नीट’ आणि सीबीएसई परीक्षांच्या पेपरफुटी प्रकरणाची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. याप्रकरणी मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी आघाडीने केली आहे.

3 तातडीच्या सर्वपक्षीय बैठकीची मागणी
देशातील सद्यःस्थितीतील
ढासळती अर्थव्यवस्था, वाढती बेरोजगारी, महागाई आणि शेतकर्‍यांचे प्रलंबित प्रश्न यावर गांभीर्याने चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने लवकरात लवकर संसदेची ’सर्वपक्षीय बैठक’ बोलवावी, असा ठराव संमत करण्यात आला आहे.

4 दर दोन महिन्यांनी समन्वय बैठक
’इंडिया’ आघाडीतील सर्व घटक पक्षांमध्ये एकजूट आणि योग्य समन्वय टिकवून ठेवण्यासाठी यापुढे सर्व पक्ष दर दोन महिन्यांनी एकत्र भेटतील, असा निर्णय घेण्यात आला आहे. याच मालिकेतील पुढील बैठक ऑगस्ट महिन्यात हैदराबाद येथे आयोजित केली जाणार आहे.

5 दररोज रणनीती आणि समन्वय
संसदेच्या आगामी अधिवेशनात (पावसाळी अधिवेशन) सरकारला कोंडीत पकडण्यासाठी, सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी अधिवेशनाच्या काळात दररोज विरोधी पक्षनेत्यांच्या दालनात भेटून आपली रणनीती व समन्वय आखण्याचा निर्णय घेतला आहे.

A vision of unity in the India Front

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *