वडिलांना भेटायला गेला अन् चोरट्यांनी घर केले साफ

36 तोळे सोने, 57 ग्रॅम चांदीसह 12.50 लाखांचा ऐवज लंपास

पंचवटी : प्रतिनिधी
पेठ रोडवरील इंद्रप्रस्थनगर भागात धक्कादायक आणि धाडसी घरफोडीची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी एका रो-हाउसच्या किचनच्या खिडकीचे गज कापून आत प्रवेश केला. देवघर तसेच बेडरूममधून तब्बल 36 तोळे सोन्याचे, 57 ग्रॅम चांदीचे दागिने आणि 10 हजार रुपये रोख, असा एकूण 12 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

याप्रकरणी सहज-अंगण रो-हाउसमध्ये राहणारे स्वप्नील जयवंत गवळी (वय 33) यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्वप्नील गवळी यांच्या वडिलांना शुक्रवारी अचानक चक्कर आल्याने त्यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वडील रुग्णालयात असल्याने स्वप्नील शुक्रवारी रात्रीपासून त्यांच्यासोबत थांबलेला होता. घरात कोणीही नसल्याची संधी चोरट्यांनी साधली.
शनिवारी सकाळी स्वप्नील जेव्हा घराची देखरेख करण्यासाठी परतला, तेव्हा त्याने मुख्य दरवाजा उघडून आत प्रवेश केला. किचनमध्ये जाताच त्याला तेथील लाइट सुरू दिसला आणि दरवाजा उघडा असलेला आढळला. बारकाईने पाहिले असता किचनच्या खिडकीचे लोखंडी गज कापलेले दिसले. यामुळे घाबरलेल्या स्वप्नीलने वरच्या खोलीत धाव घेतली, तेव्हा सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले होते.
घरात मोठी चोरी झाल्याचे लक्षात येताच त्याने तत्काळ म्हसरूळ पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. या घटनेनंतर पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख, म्हसरूळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोहन माछरे आदींसह गुन्हेशोध पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

Went to meet father and thieves cleaned out house

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *