घोडेबाजार टळला; दराडेंच्या निवडीची उरली औपचारिकता
नाशिक : अश्विनी पांडे
विरोधी उमेदवाराच्या मुलाने आपला बाप काढला म्हणून आता माघार नाही, यावर अडून बसलले नाशिक विधान परिषद निवडणुकीतील अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी अखेर माघार घेतली. मुख्यमंत्र्यांपासून तर कुंभमेळामंत्री व्हाया उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्री अशा सर्वांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आणि शिंदेसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विधान परिषदेचा मार्ग एकदाचा निर्धोक झाला. गिते यांची माघार झाली असली तरी यानिमित्ताने एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. महायुतीकडून बिनविरोध निवडणुकीचा अट्टहास कशासाठी?
विधान परिषदेच्या निवडणुकीत सुरुवातीपासूनच नाशिक शहरात ट्विस्ट अॅण्ड टर्नच्या घडामोडी घडल्या. महायुतीकडून उमेदवारीसाठी अनेक जण इच्छुक होते. मात्र, अखेर नरेंद्र दराडे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली. नाशिक शहरात व जिल्ह्यात महायुतीचे वर्चस्व असल्याने विजयाची माळ नरेंद्र दराडे यांच्यात गळ्यात पडणार हे जवळपास निश्चित होते. मात्र, भाजपातील गणेश गिते आणि गोकुळ गिते यांनी अर्ज भरल्यानंतर खर्या अर्थाने निवडणुकीला रंगत आली. रिंगणात एकूण 9 उमेदवार होते. मात्र, महायुतीच्या बड्या नेत्यांकडून सुरुवातीपासूनच निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात येत होते. त्यामुळे बंडोबांचे बंड थंड करण्यासाठी महायुतीचे बडे नेते मैदानात उतरले. यात नऊपैकी माघारीच्या दिवशी विष्णुपंत म्हैसधुणे, निवृत्ती बोडके, कुणाल दराडे, अब्दुल रशीद, गणेश गिते, परवेझ कोकणी अशा सहा जणांनी माघार घेतली असली, तरी तीन जण रिंगणात होते. यात भाजपाचे दोन बंडखोर उमेदवार होते. एक प्रसाद हिरे आणि दुसरे गोकुळ गिते. त्यामुळे निवडणूक तिरंगी होणार, अशी शक्यता होती. मात्र, भाजपाचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन यांनी प्रसाद हिरे यांच्याशी चर्चा करून त्यांचे बंड शमवले आणि हिरे यांनी नरेंद्र दराडे यांना पाठिंबा दिला. मात्र, गोकुळ गिते रिंगणात असल्याने आता थेट लढत होणार असे चित्र असताना, महायुतीचे तीन तीन मंत्री गोकुळ गिते यांनी माघार घ्यावी यासाठी प्रयत्न करीत होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील बंड शमवण्यासाठी प्रयत्नात होते. त्यामुळे मंत्रिमंडळातील तीन प्रमुख मंत्री गोकुळ गिते यांच्याशी चर्चा करताना दिसत होते. त्यात भाजपाचे कुंभमेळामंत्री गिरीश महाजन, उद्योेग मंत्री उदय सामंत व शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांचातर सक्रिय सहभाग होता. उदय सामंत यांनी तर नाशिकमध्ये मुक्कामच ठोकला होता, तीन वेळा नाशिक गाठून हे बंड थोपवण्यासाठी त्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. परिणामी, या सर्व घडामोडींनंतर सर्वसामान्य जनतेच्या मनात एकच प्रश्न निर्माण होत आहे की, गोकुळ गिते यांनी माघार घ्यावी यासाठी महायुतीच्या नेत्यांनी इतके का जीवाचे रान केले? निवडणूक झाली असती तरी महायुतीचे जिल्ह्यातील पक्षीय बलाबल पाहता महायुतीला फारसे अवघड काहीच नव्हते.
नाशिक विधान परिषद मतदारसंघात 619 मतदार आहेत. त्यातील 466 मतदार महायुतीचे आहेत. तर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची मतदारसंख्या शंभराच्या आसपास आहे. भाजपाकडे 188 नगरसेवक आहेत, तर शिवसेनेकडे 171 नगरसेवक आहेत. परिणामी, महायुतीकडून गोकुळ गिते यांच्या माघारीसाठी करण्यात आलेेले प्रयत्न लोकशाही प्रक्रियेला आव्हान देणारे आहेत का, असा प्रश्न सर्व घडामोडी पाहता सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झालेला आहे. एकीकडे मनधरणी सुरू असताना दुसरीकडे राज्य सरकारच्या कायदेशीर सल्लागार सहसचिवांनी अतिरिक्त सरकारी वकील, उच्च न्यायालय यांना पाठवलेले एक पत्र. या पत्रामध्ये गोकुळ गिते यांचे बंधू गणेश गिते यांना म्हाडा प्रकरणात उच्च न्यायालयाने मंजूर केलेल्या अटकपूर्व जामिनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या सूचना करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. 1 जून रोजीच गणेश गिते यांच्या जामिनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याबाबतचे पत्र प्राप्त झाल्याचे समोर आहे. त्यामुळे गोकुळ गिते यांची एकीकडे मनधरणी सुरू असताना, दुसरीकडे राजकीय दबावतंत्राचा वापर करण्यात आला आणि त्यामुळेच अखेर गोकुळ गिते यांना माघार घेतली.
Why the insistence on an uncontested election for the Legislative Council?