आंधळे वस्तीपर्यंत पोहोचणार पूरचारीचे पाणी खंबाळेच्या शेतकर्यांना दिलासा

सिन्नर : प्रतिनिधी
अनेक वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना करणार्या खंबाळे गावातील खोपडी खुर्द (आंधळे वस्ती) परिसरातील शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आमदार माणिकराव कोकाटे यांच्या पुढाकारातून देवनदीवरील कुंदेवाडी-सायाळे पूरचारीचे पाणी स्थानिक बंधार्याकडे वळविण्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली असून, त्यामुळे परिसरातील शेतीसाठी पाण्याचा नवा स्रोत उपलब्ध होणार आहे.
आंधळे वस्ती परिसरातील ग्रामस्थांनी अलीकडेच आमदार माणिकराव कोकाटे यांची भेट घेऊन पाणीप्रश्न मांडला होता. पुराच्या काळात वाहून जाणारे पाणी शेतीसाठी उपयोगात आणावे, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर आमदार कोकाटे यांनी तातडीने दखल घेत संबंधित काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या. या कामामुळे खंबाळे परिसरातील शेतकर्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार असून, वर्षानुवर्षे पाण्याअभावी त्रस्त शेतकर्यांच्या आशा पुन्हा जागृत झाल्या आहेत. भविष्यात शेती उत्पादन वाढीसाठीही या प्रकल्पाचा फायदा होणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. कामाला सुरुवात झाल्यानंतर ग्रामस्थांनी आ. कोकाटे यांची भेट घेऊन समाधान व्यक्त केले. यावेळी सरपंच मीननाथ डावरे, विश्वनाथ आंधळे, संतोष सानप यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रत्येक शेतकर्याच्या शिवारापर्यंत पाणी पोहोचविणार
तालुक्यातील प्रत्येक शेतकरी महत्त्वाचा आहे. कोणत्याही राजकीय दृष्टिकोनातून नव्हे, तर विकासाच्या दृष्टीने प्रत्येक शिवारापर्यंत पाणी पोहोचावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे आमदार माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.
Work begins on diverting the flow of the Kundewadi-Sayale flood channel.