विविध साहित्य 10 टक्क्यांनी महाग, पालकांचे बजेट कोलमडले
♦ इंधन दरवाढ, कागद महागाईचा परिणाम
♦ गणवेश, वह्या-पुस्तकांसह शालेय खर्चात वाढ
नाशिक : प्रतिनिधी
सर्वत्र आजपासून (सोमवार, दि. 15) नवीन शैक्षणिक सत्र सुरू होत आहे. त्यामुळे शालेय साहित्य खरेदीसाठी बाजारपेठांत पालक आणि विद्यार्थ्यांनी शनिवार, रविवारी गर्दी केली होती. शालेय खरेदीचा सुपर वीकेंड ठरला.
यंदा जागतिक स्तरावरील युद्धस्थितीमुळे वाढलेले इंधनाचे दर, कागद व कापडाच्या किमतीतील वाढ याचा थेट परिणाम शिक्षण क्षेत्रावर दिसू लागला आहे. यंदा शालेय साहित्याच्या दरात 5 ते 10 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. आधीच शैक्षणिक शुल्क, वाहनव्यवस्था आणि इतर खर्च वाढलेले असताना वह्या-पुस्तके, गणवेश, दप्तर आणि बूट यांच्या वाढलेल्या किमतींमुळे मध्यमवर्गीय पालकांचे आर्थिक गणित विस्कटले आहे.
शहरातील मेनरोड, रविवार कारंजा, सिडको आणि नाशिकरोड परिसरातील शालेय साहित्य विक्रीच्या दुकानांमध्ये पालक आणि विद्यार्थ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी पालकांची गर्दी झाली होती. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्याही निर्माण झाली होती.
यावर्षी प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी केवळ मूलभूत शैक्षणिक साहित्य खरेदीसाठीच पालकांना किमान तीन ते पाच हजार रुपयांपर्यंत खर्च करावा लागत आहे. वह्या, पुस्तके, शालेय दप्तर, गणवेश, बूट, पायमोजे, पाण्याच्या बाटल्या, डबे आणि इतर स्टेशनरी साहित्य यांच्या किमतीत वाढ झाल्याने पालकांमध्ये नाराजीचा सूर होता
प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी वह्या व पुस्तकांवर साधारण तीन ते पाच हजार रुपये, दप्तरासाठी 350 ते 1,500 रुपये, बूट व पायमोज्यासाठी 500 ते 1,000 रुपये, शालेय गणवेशासाठी 700 ते 3,500 रुपये, तर इतर साहित्यावर 500 ते 1,000 रुपयांपर्यंत खर्च होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे एका विद्यार्थ्याच्या शैक्षणिक तयारीसाठी मोठा आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे. कागद आणि कापडाच्या वाढत्या किमतीमुळे शालेय साहित्य महागल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. यंदा शाळा सुरू होण्याचा उत्साह कायम असला, तरी वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर शिक्षणाचा खर्च सर्वसामान्य कुटुंबांसाठी चिंतेचा विषय ठरत असल्याचे चित्र आहे.
Super Sunday for School Supplies Shopping