अकरावी प्रवेशप्रक्रियेला वेग

राज्यभरात 93.96 लाख विद्यार्थ्यांची नोंदणी

♦ दुसर्‍या फेरीत 2.63 लाख विद्यार्थ्यांना अलॉटमेंट
♦ 32,476 विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित

नाशिक : प्रतिनिधी
राज्यातील इयत्ता 11 वीच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेला वेग आला असून, शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी आतापर्यंत 93 लाख 96 हजार 449 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. राज्यातील 6,498 कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेशप्रक्रिया सुरू असून, दुसर्‍या फेरीत 5,17,658 विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम नोंदवून प्रवेश अर्ज लॉक केले आहेत. त्यापैकी 2,63,037 विद्यार्थ्यांना अलॉटमेंट प्राप्त झाले असून, 13 जून 2026 रोजी 32,476 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला असल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने जाहीर केली आहे.
शिक्षण संचालनालयाच्या प्रसिद्धिपत्रकानुसार, दुसर्‍या फेरीत अलॉटमेंट झालेल्या विद्यार्थ्यांना 13 जून 2026 ते 16 जून 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत प्रवेश संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
राज्यातील प्रवेशप्रक्रियेत कॅम्पअंतर्गत 22,417, तर कोटा अंतर्गत (इन-हाउस, व्यवस्थापन व अल्पसंख्याक कोटा) 10,059 असे मिळून एकूण 32,476 प्रवेश निश्चित झाले आहेत.
यामध्ये मुंबई विभागात सर्वाधिक 6,661 प्रवेश निश्चित झाले असून, पुणे विभाग 5,286 प्रवेशांसह दुसर्‍या क्रमांकावर आहे. तर लातूर विभागात सर्वांत कमी 1,829 प्रवेश नोंदवले गेले आहेत.
दरम्यान, विद्यार्थ्यांनी केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता स्वतःच्या लॉगिनमधून अलॉटमेंट तपासून संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्यक्ष प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने केले आहे.

विभागनिहाय प्रवेश आकडेवारी पुढीलप्रमाणे
विभाग                             कॅम्प          कोटा        एकूण
अमरावती                        2,864        1,007      3,871
छत्रपती संभाजीनगर       2,820        944          3,764
कोल्हापूर विभाग            2,386          605         2,991
लातूर विभाग                  1,284         545          1,829
मुंबई विभाग                  3,080        3,581        6,661
नागपूर विभाग               3,501         1,048        4,549
नाशिक विभाग               2,602            613        3,215
पुणे विभाग                     3,880      1,406         5,286

 

Speeding up the 11th admission process

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *