30 जूनपर्यंत प्रक्रिया पूर्ण करा; नाशिक जिल्ह्यात 99 टक्के पडताळणी
मालेगाव : प्रतिनिधी
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेच्या लाभार्थी शेतकर्यांसाठी वार्षिक ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली आहे. 30 जून 2026 पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण न करणार्या शेतकर्यांना योजनेच्या पुढील हप्त्याचा लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे कृषी विभागाने पात्र लाभार्थी शेतकर्यांनी मुदत संपण्यापूर्वी ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
शेतकर्यांच्या सोयीसाठी कृषी विभागामार्फत गावोगावी विशेष ई-केवायसी शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबिरांमध्ये लाभार्थींना आवश्यक मार्गदर्शन व तांत्रिक मदत दिली जात आहे. तसेच जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) येथे बायोमेट्रिक पद्धतीने अंगठ्याच्या ठशाद्वारेही ई-केवायसी करता येत आहे. ‘पीएम-किसान’ मोबाइल अॅपवरील फेस ऑथेंटिकेशन सुविधेच्या माध्यमातून शेतकरी घरबसल्यादेखील ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतात. अंतिम मुदतीची वाट न पाहता लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करून पुढील हप्ता निश्चित करून घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यात ई-केवायसी मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला असून, जिल्ह्यातील सुमारे 99 टक्के लाभार्थी शेतकर्यांची पडताळणी पूर्ण झाली आहे. प्रशासकीय अहवालानुसार केवळ एक टक्का लाभार्थी अद्याप प्रलंबित आहेत. बागलाण, चांदवड, देवळा, दिंडोरी, इगतपुरी, कळवण, मालेगाव, नांदगाव, नाशिक, पेठ, सिन्नर आणि त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्ये 99 टक्के ई-केवायसी पूर्ण झाली आहे. तर निफाड आणि येवला तालुक्यांनी 100 टक्के उद्दिष्ट गाठून आदर्श कामगिरी केली आहे.
आदिवासीबहुल सुरगाणा तालुक्यात ई-केवायसीची प्रगती 98 टक्क्यांपर्यंत पोहोचली असून, दोन टक्के लाभार्थी अद्याप प्रलंबित आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक प्रलंबित लाभार्थी सुरगाणा तालुक्यात असल्याची नोंद आहे. उर्वरित लाभार्थ्यांची ई-केवायसी लवकर पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. शेतकर्यांनी आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या सेवा केंद्राशी किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधून प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
e-KYC mandatory for PM-Kisan