आमदार बनकरांच्या प्रयत्नांना यश; नदीकाठच्या आठ गावांना दिलासा
मौजे सुकेणे : वार्ताहर
जूनचा दुसरा आठवडा उलटल्यानंतरही मान्सून लांबल्यामुळे संपूर्ण निफाड तालुक्याला ऐन उन्हाळ्यासारख्या तीव्र झळा सहन कराव्या लागत आहेत. या पार्श्वभूमीवर, पाण्यासाठी त्रस्त असलेल्या बाणगंगा नदीकाठच्या गावांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे.
निफाडचे आमदार दिलीपराव बनकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे बाणगंगा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. कोरडीठाक पडलेली नदी पुन्हा एकदा खळखळून वाहू लागली आहे. यामुळे परिसरातील नागरिक, शेतकरी आणि पशुपालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण
झाले आहे.
पाण्याचा प्रश्न सुटणार
बाणगंगा नदीपात्रात पाणी प्रवाहित झाल्यामुळे नदीकाठच्या आठ गावांना थेट फायदा होणार आहे. ओझर, दिक्षी, दात्याणे, जिव्हाळे, थेरगाव, ओणे, मौजे सुकेणे आणि कसबे सुकेणे या आठ गावांमधील पिण्याच्या पाण्याचा तीव्र टंचाईचा प्रश्न आता निकाली निघणार आहे. तसेच नदीकाठच्या विहिरी, कूपनलिका (बोअरवेल) आणि इतर स्थानिक जलस्रोतांची भूजलपातळी वाढण्यास मोठी मदत होणार आहे.
डाव्या कालव्याचे आवर्तन
सध्या कडक ऊन आणि पाण्याच्या वाढत्या मागणीमुळे जलसंकट गडद झाले होते. ही परिस्थिती ओळखून आमदार बनकर यांनी जलसंपदा विभागाकडे तातडीने नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी केली होती.
प्रशासनाने यावर सकारात्मक निर्णय घेत गंगापूर डाव्या कालव्याचे जून महिन्यातील शेवटचे आवर्तन बाणगंगा नदीत वळवले.
पशुपालकांना नवसंजीवनी
मान्सून लांबल्यामुळे पिके जळू लागली होती, तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा व चार्याचा प्रश्न गंभीर बनला होता. मात्र, नदीत पाणी आल्यामुळे आता पिकांना जीवदान मिळणार असून, पशुधनाच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. ऐन संकटकाळात पाण्याचा प्रश्न सोडविल्याबद्दल नदीकाठच्या ग्रामस्थांनी व शेतकर्यांनी आमदार दिलीप बनकर आणि प्रशासनाचे आभार मानले आहेत.
In the summer, the river Banganga was overflowing