– प्रा. डॉ. धीरज झाल्टे
आजच्या स्पर्धेच्या व माहिती तंत्रज्ञानाच्या युगात जागतिकीकरणामुळे व्यापार, उद्योग, व्यवसाय आणि सेवा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात झपाट्याने बदल होत आहेत. त्यामुळे वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना आगामी काळात नोकरी व व्यवसायाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
वाणिज्य शाखेत 11 वीपासून बी.कॉम., एम.कॉम.पर्यंतच्या अभ्यासक्रमाचा बारकाईने अभ्यास केला असता प्रशासन, व्यवस्थापन, व्यावसायिक कौशल्ये, उद्योजकता, अकाऊंटिंग, ऑडिटिंग, मार्केटिंग, बँकिंग, संघटन, सहकार, कंपनी व्यवहार, व्यापार व व्यवसाय विषयक कायदे, कार्यालय व्यवस्थापन, अर्थशास्त्र, कॉस्टिंग, वित्तीय व्यवस्थापन, मनुष्यबळ व्यवस्थापन, कररचना, व्यावसायिक संज्ञापन तसेच संगणकीय अकाउंंटिंग यांसारख्या विविध विषयांचे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळते. अनेक विषयांमध्ये सैद्धांतिक ज्ञानाबरोबरच प्रात्यक्षिक शिक्षणाचाही समावेश असतो.
जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरणाच्या प्रक्रियेमुळे होत असलेल्या बदलांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये विविध कौशल्ये विकसित करण्याच्या दृष्टीने विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये अनेक उपक्रम राबविले जात आहेत. वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी हे ज्ञान आणि कौशल्ये आत्मसात केल्यास त्यांच्यासाठी रोजगाराच्या अनेक संधी खुल्या होऊ शकतात.
आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात
स्पर्धेत टिकून राहण्यासाठी बहुविषयक कौशल्यांची गरज आहे आणि ही कौशल्ये वाणिज्य शिक्षणातून मोठ्या प्रमाणात मिळू शकतात. इतर अनेक शाखांमध्ये प्रात्यक्षिक शिक्षणाचा अभाव असल्याने पदवीधरांना अपेक्षित रोजगार मिळण्यात अडचणी येतात; मात्र वाणिज्य शाखा याला काही प्रमाणात अपवाद ठरते.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार विद्यापीठांनी आपल्या अभ्यासक्रमात रोजगाराभिमुख आणि कौशल्याधारित बदल केले आहेत. पदवीबरोबरच व्यावहारिक ज्ञानालाही महत्त्व देण्यात येत असून, प्रात्यक्षिक शिक्षणावर भर वाढविण्यात आला आहे. उद्योग-व्यवसायाशी सुसंगत अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना जागतिक स्पर्धेला समर्थपणे तोंड देता येते.
वाणिज्य शाखेतून उद्योजकता विकसित होण्यास मदत होते. त्यामुळे केवळ नोकरी शोधणारे नव्हे तर रोजगार निर्माण करणारे उद्योजक घडविण्याची क्षमता या शिक्षणात आहे. बँकिंग क्षेत्रात तसेच सरकारी व खाजगी संस्था, कंपन्या, महामंडळे, शैक्षणिक संस्था, सहकारी संस्था आणि व्यापारी प्रतिष्ठानांमध्ये लेखापाल, कार्यालय अधीक्षक, व्यवस्थापक अशा विविध पदांवर रोजगाराच्या संधी उपलब्ध असतात.
बी.कॉम. किंवा एम.कॉम. पदवीधर विद्यार्थी सनदी लेखापाल, कंपनी सेक्रेटरी, कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंंटंट यांसारख्या व्यावसायिक क्षेत्रात करिअर करू शकतात. याशिवाय रिटेल क्षेत्र, प्रसारमाध्यमे, शॉपिंग मॉल्स, हॉटेल उद्योग, पर्यटन व्यवसाय, रुग्णालये व वैद्यकीय क्षेत्रातही व्यवस्थापक आणि अकाउंंटंट म्हणून संधी उपलब्ध असतात.
टॅली सॉफ्टवेअर आणि संगणकीय अकाउंंटिंगचे ज्ञान असलेल्या विद्यार्थ्यांना छोट्या-मोठ्या उद्योग व व्यापारी संस्थांमध्ये चांगल्या वेतनावर रोजगार मिळू शकतो. वस्तू व सेवा कर प्रणालीमुळे कुशल अकाउंंटंट्सची मागणी वाढली आहे. ॠडढ नोंदणी, रिटर्न भरणे, करप्रणालीचे व्यवस्थापन यासंबंधीचे ज्ञान वाणिज्य अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहे.
महाविद्यालयांमार्फत विद्यार्थ्यांना बँका, कंपन्या, उद्योग, सरकारी व खाजगी कार्यालयांना भेटी देऊन प्रत्यक्ष अनुभव दिला जातो. यामुळे आत्मविश्वास, नेतृत्वगुण, व्यवस्थापन कौशल्ये आणि उद्योजकीय दृष्टी विकसित होते.
आज कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), उहरींॠझढ आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभाव वाढत असला तरी अकाउंंटिंग, ऑडिटिंग, व्यवस्थापन, प्रशासन आणि करसल्ला यांसारख्या क्षेत्रांमध्ये कुशल मनुष्यबळाची गरज कायम राहणार आहे. त्यामुळे वाणिज्य शिक्षणाचे महत्त्व भविष्यात अधिक वाढणार आहे.
उत्पादन प्रक्रिया, भाजीपाला व फळबाग व्यवस्थापन, कृषी विपणन, आयात-निर्यात, शेतमाल प्रक्रिया आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञान यांसारख्या विषयांचे ज्ञान घेतल्यास कृषी क्षेत्रातही विद्यार्थ्यांना रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
एकंदरीत विचार करता, वाणिज्य शाखा ही सर्वाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारी शाखा आहे. त्यामुळे दहावी किंवा बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेत प्रवेश घेऊन आपले करिअर घडवावे.
(लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेत अभ्यास मंडळाचे सदस्य आहेत.)
The Commerce stream offers the highest number of employment opportunities in jobs and business.