विलीनीकरणाच्या चर्चा फेटाळल्या
मुंबई : प्रतिनिधी
शिवसेनेच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त सायन येथील षण्मुखानंद सभागृहात आयोजित मेळाव्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (दि. 19) अत्यंत आक्रमक आणि भावनिक भाषण केले. यावेळी त्यांनी भाजप, एकनाथ शिंदे गट आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली. काँग्रेसमध्ये पक्ष विलीन होण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला. या सोहळ्यात सांगलीच्या एका युवा कवीच्या भाषणाने ठाकरे पिता-पुत्रांना भावुक केल्याचेही पाहायला मिळाले.
शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, मला कुठलीही हाव नाही. माझ्यावर जे आरोप केले जात आहेत, ते जर खरे असतील तर मी आता हे शिवसेना पक्षप्रमुखपद सोडायला तयार आहे. ही सोन्यासारखी शिवसेना मला चोर आणि दरोडेखोरांच्या हातात जाऊ द्यायची नाही. तुमच्यापैकी एक सामान्य शिवसैनिक पुढे येऊ द्या, तो शिवसेना पक्षप्रमुख होईल, असे सांगत त्यांनी शिवसैनिकांच्या निष्ठेवर विश्वास व्यक्त केला.
’मातोश्री’ आणि ठाकरे कुटुंबावर (पत्नी, आदित्य आणि तेजस) होणार्या वैयक्तिक आरोपांचाही त्यांनी समाचार घेतला. तसेच, मणिपूर आणि पश्चिम बंगालच्या परिस्थितीची तुलना करत मोदी सरकारला लक्ष्य केले. बंगालमध्ये निवडणुका जिंकण्यासाठी सुरक्षा दल पाठवले जाते, मग मणिपूरमध्ये का नाही? असा सवाल करत त्यांनी हिंमत असेल तर पाकिस्तानात घुसा, असे आव्हान दिले. भाजपचे हिंदुत्व हे ’भोंदुत्व’ असल्याचेही ते म्हणाले.
‘काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही; उलट भाजपच शिंदेसेनेत विलीन होईल’
शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार, या विरोधकांच्या टीकेला उद्धव ठाकरे यांनी सडेतोड उत्तर दिले. आम्ही इतकी वर्षे भाजपसोबत राहूनही त्यांच्यात विलीन झालो नाही, तर काँग्रेसमध्ये कसे विलीन होणार? असा थेट सवाल त्यांनी केला. उलट परिस्थिती अशी आहे की, भाजपच आता शिंदेसेनेत विलीन होईल की काय, अशी भीती वाटू लागली आहे, असा टोला त्यांनी लगावला. संकटांमुळे शिवसैनिक खचला नसून तो अधिक पेटून उठला असल्याचे ते म्हणाले. तसेच, केवळ निवडणुका जिंकणे म्हणजेच यश नव्हे, तर विचारधारा टिकवणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
ठळक वैशिष्ट्ये :
♦ पक्षप्रमुखपदाचा त्याग करण्याची तयारी :आपल्यावरील आरोप सिद्ध झाल्यास शिवसेना पक्षप्रमुखपद सोडण्याची उद्धव ठाकरे यांची तयारी. एखाद्या सामान्य शिवसैनिकाला पक्षप्रमुख करण्याची ग्वाही.
♦ भाजपवर बोचरी टीका : स्वतःकडे बहुमत नसल्याने भाजपची ’पोरं पळवणारी टोळी’ झाली असून, त्यांनी ’स्वतःच्या वांझोट्यापणावर’ उपचार करावेत, असा घणाघात.
♦ विलीनीकरणास स्पष्ट नकार : भाजपसोबत अनेक वर्षे राहूनही पक्ष विलीन झाला नाही. त्यामुळे काँग्रेसमध्ये शिवसेना विलीन होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे स्पष्टीकरण.
♦ शिंदेसेनेबाबत भाजपला टोला : शिवसैनिक खचला नसून पेटून उठला आहे. आता भाजपच शिंदेसेनेत विलीन होईल की काय, अशी भीती वाटत असल्याचा टोला.
ठाकरे कुटुंबीय भावुक : सांगलीचे युवा कवी नितीन चंदनशिवे यांनी कोरोना काळातील आठवणींना दिलेला उजाळा ऐकून उद्धव व आदित्य ठाकरे यांचे डोळे पाणावले.
‘तुमच्या वांझोटेपणावर उपचार करा…’
शिवसेनेत दुसर्यांदा पडलेल्या फुटीवर आणि नेत्यांच्या पक्षांतरावर बोलताना ठाकरे यांनी भाजपवर अत्यंत तिखट शब्दांत हल्लाबोल केला. ते म्हणाले, की आज भाजपकडे स्वतःचे दोन तृतीयांश बहुमत नाही म्हणूनच ते आमची पोरं पळवत आहेत. तुमच्या वांझोट्यापणावर आधी तुम्ही उपचार करा. आमची पोरं कशाला पळवता? तुमची पोरं पळवणारी टोळी आहे.
नितीन चंदनशिवे यांच्या भाषणाने ठाकरे भावुक
युवा कवी नितीन चंदनशिवे यांच्या भाषणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कोरोनातील उद्धव ठाकरे यांच्या कामाचे कौतुक करताना त्यांनी आजीचा किस्सा सांगितला. कोरोनाच्या काळात साहेब न भेटताही माझ्या आजीला ते लेकासारखे वाटले, या त्यांच्या वाक्याने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या डोळ्यांत पाणी आले.
thackeray-prepares-to-step-down-as-party-chief