साकूरसह परिसरात पिके जळू लागल्याने शेतकरी हवालदिल
कवडदरा : वार्ताहर
इगतपुरी तालुक्यातील कवडदरा, साकूर, भरवीर, घोटी खुर्दवाडी, रोंगटेवाडी, जाधववाडी आणि धामणगाव हा परिसर भौगोलिकदृष्ट्या अत्यंत डोंगराळ व दुर्गम आहे. संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणार्या इगतपुरी तालुक्यातच आता तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली असून, पाण्याचे सर्व साठे संपुष्टात आले आहेत.
दरवर्षी या परिसरामध्ये मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात पाण्यासाठी ग्रामस्थांना मोठा संघर्ष करावा लागतो. मात्र, यंदा जून महिना संपत आला तरी पावसाचा पत्ता नसल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. स्थानिक पाणीपुरवठा करणारे सर्व स्रोत कोरडे पडल्यामुळे नागरिकांसमोर भीषण संकट उभे ठाकले आहे. मुख्य बाजारपेठ असलेल्या साकूर फाटा परिसरात अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने नागरिक व्याकूळ झाले आहेत. महिलांना पुन्हा एकदा पाण्यासाठी डोक्यावर हंडा घेऊन मैलोन्मैल भटकंती करावी लागत आहे.
या भागातील शेतकरी प्रामुख्याने भात, सोयाबीन आणि कांदा या नगदी पिकांना प्राधान्य देतात. परंतु, यंदा जून अखेरपर्यंत पावसाचा एक थेंबही न पडल्याने पिके शेतकर्यांच्या डोळ्यांदेखत जळून खाक होत आहेत. प्रचंड उष्णतेची लाट आणि पाण्याची टंचाई यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे. पिकांसोबतच जनावरांचा चारा असलेले घास, मका, कडवळ आणि गिन्नी गवत यांसारखी पिकेही अंतिम श्वास घेत आहेत.
पावसाअभावी लावणीची कामे खोळंबली असून, भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने आता धरणांमधून सोडली जाणारी आवर्तने बंद केली आहेत. त्यामुळे शेतकर्यांच्या भाषेत सांगायचे तर, भर पावसाळ्यात पाण्याला आग लागली आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
चार्यासाठी उपाययोजनांची गरज
जर येत्या 30 जूनपर्यंत पाऊस पडला नाही तर शेतकर्यांना शेती करणे अशक्य होणार आहे. या पार्श्वभूमीवर, आता पिण्याच्या पाण्यासाठी आणि जनावरांच्या चार्यासाठी सरकार कोणत्या उपाययोजना करते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
Women’s struggle for water during the monsoon