निमाणी चाळ परिसरात नागरिकांशी साधला संवाद
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना मूलभूत सुविधा दर्जेदार व अखंडितपणे उपलब्ध व्हाव्यात, यासाठी नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी प्रभात क्रमांक सात परिसरातील निमाणी चाळ येथे भेट देत ड्रेनेज लाइन व पाणीपुरवठा व्यवस्थेची सखोल पाहणी केली. तसेच परिसरातील नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने ही पाहणी करण्यात आली.
यावेळी महापौरांनी संबंधित विभागांच्या अधिकार्यांसमवेत परिसरातील विद्यमान परिस्थितीची माहिती घेतली. ड्रेनेज लाइनमधील अडथळे, सांडपाण्याचा निचरा, पावसाळ्यात निर्माण होणार्या अडचणी तसेच पाणीपुरवठा लाइनची स्थिती, पाण्याचा दाब, गळती व नागरिकांना भेडसावणार्या विविध समस्यांबाबत त्यांनी सविस्तर आढावा घेतला.
पाहणीदरम्यान पाणीपुरवठा विभागाचे रवींद्र धारणकर, बांधकाम विभागाचे नीलेश साळी, कनिष्ठ अभियंता राकेश पवार, कनिष्ठ अभियंता मनीष उगले, पूनम महाजन, कविता महाजन, राहुल कुटे, नीलेश तुरे व परिसरातील नागरिक उपस्थित होते. महापौरांनी अधिकार्यांना नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने घेऊन त्यांचे तातडीने निराकरण करण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांशी संवाद साधताना महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी परिसरातील रहिवाशांच्या अडचणी जाणून घेतल्या. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या काही समस्यांबाबत नागरिकांनी त्यांच्यासमोर मते मांडली. त्यावर महापौरांनी संबंधित अधिकार्यांना आवश्यक तांत्रिक पाहणी करून कार्यवाहीचा आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले.
तसेच परिसरातील ड्रेनेज लाइनची दुरुस्ती, साफसफाई आणि आवश्यकतेनुसार नव्या सुविधांच्या उभारणीसंदर्भात संबंधित विभागांना प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पाणीपुरवठा व्यवस्थेतील तांत्रिक अडचणी दूर करून नागरिकांना नियमित व सुरळीत पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
निमाणी चाळ परिसरातील नागरिकांनी महापौरांनी स्वतः उपस्थित राहून समस्या जाणून घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले. प्रत्यक्ष पाहणीमुळे अनेक प्रलंबित प्रश्नांवर लवकरच मार्ग निघेल, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.
या पाहणी दौर्यामुळे परिसरातील नागरी सुविधांच्या उन्नतीसाठी महानगरपालिका प्रशासन अधिक प्रभावीपणे कार्यरत झाले असून, नागरिकांच्या प्रश्नांवर तत्परतेने कार्यवाही करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचा संदेश देण्यात आला.
जीवनाशी निगडित समस्या प्राधान्याने सोडविणार
यावेळी महापौरांनी सांगितले की, नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि
दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देणे ही महानगरपालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे. पाणीपुरवठा व ड्रेनेज व्यवस्थेशी संबंधित कोणतीही समस्या दुर्लक्षित केली जाणार नाही. नागरिकांच्या आरोग्याशी आणि दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्नांना प्राधान्य देऊन त्वरित उपाययोजना करण्यात येतील.
Mayor Adke inspects drainage and water supply issues.