सातपूर औद्योगिक परिसरात डिझेल चोरांचा धुमाकूळ

सातपूर औद्योगिक परिसरात डिझेल चोरांचा धुमाकूळ

एका रात्रीत 4 जड वाहनांमधून 300 ते 400 लिटर डिझेलची चोरी

सातपूर : प्रतिनिधी

सातपूर औद्योगिक परिसरात डिझेल चोरांचे धाडस दिवसेंदिवस वाढत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. मंगळवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी सिटी लिंक लॉजिस्टिक्स कंपनीच्या चार जड मालवाहू वाहनांच्या डिझेल टाक्यांचे लॉक तोडून अंदाजे 300 ते 400 लिटर डिझेल चोरी केल्याची घटना घडली आहे ही घटना उज्ज्वल एजन्सीजसमोर, मंदिराजवळ, सातपूर येथे घडली. चोरी झालेल्या वाहनांचे क्रमांक NL 01 AB 7053, NL 01 AB 7052, NL 01 AB 8009 आणि NL 01 AD 0709 असे असून ही सर्व वाहने अशोक लेलँड कंपनीची 14 चाकी मालवाहू वाहने आहेत घटनास्थळासमोरील एका कंपनीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काही संशयित व्यक्ती एका कारमधून येताना आणि जाताना दिसून आल्या आहेत. प्राथमिक तपासात संबंधित कारचा क्रमांक MH 15 DC 7457 असा आढळून आला. मात्र, पुढील पोलिस तपासात आरोपींनी बनावट (डुप्लिकेट) नंबर प्लेट लावून ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे.
सिटी लिंक लॉजिस्टिक्सचे संचालक ओमप्रकाश यादव यांनी सांगितले की, या घटनेमुळे कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून परिसरातील इतर वाहन मालकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांनी पोलिस प्रशासनाकडे आरोपींचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची तसेच औद्योगिक परिसरात रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी केली आहे स्थानिक उद्योजक व ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनीही या घटनेबाबत चिंता व्यक्त केली असून, गेल्या काही काळात डिझेल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे सांगितले आहे. अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे सध्या सातपूर पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, सीसीटीव्ही फुटेज व इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *