वन-डे क्रिकेटचे नवे वैभव

कोलंबो/मुंबई :
भारतीय क्रिकेटचा नवा उगवता तारा आणि पंधरावर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशीने रविवारी डंबुला येथे खेळल्या गेलेल्या ट्राय-नेशन सिरीजच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. इंडिया-ए कडून खेळताना वैभवने श्रीलंका-ए विरुद्ध अवघ्या 11 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावून एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वांत वेगवान अर्धशतक ठोकण्याचा नवा वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केले आहे. त्याने श्रीलंकेच्याच कौशल्या वीररत्नेचा 2005 मधील 12 चेंडूंचा विक्रम मोडीत काढला. वैभवने अवघ्या 29 चेंडूंचा सामना करताना 324.14 च्या चक्रावून टाकणार्‍या स्ट्राइक रेटने तब्बल 94 धावांची वादळी खेळी केली, ज्यामध्ये 10 चौकार आणि 8 गगनभेदी षटकारांचा समावेश होता. या लढतीत श्रीलंकेने टॉस जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले, मात्र वैभव सूर्यवंशीच्या मनात काहीतरी वेगळेच चालले होते. पहिल्या 5 चेंडूंवर त्याने 3 चौकार आणि 2 षटकार मारून आपले इरादे स्पष्ट केले. त्याने तिसर्‍या ओव्हरमध्ये मोहम्मद शिराजला तब्बल 26 धावा कुटल्या, तर दुलाज समिदिथाच्या चेंडूवर सलग दोन षटकार ठोकून अवघ्या 11 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. वैभव ऑस्ट्रेलियाच्या जेक फ्रेझर-मॅकगर्कच्या 29 चेंडूंतील सर्वात वेगवान शतकाच्या जागतिक विक्रमाची बरोबरी करण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता, परंतु 9 व्या ओव्हरमध्ये शतक पूर्ण होण्यास अवघ्या 6 धावा बाकी असताना तो झेलबाद झाला आणि त्याची ही ऐतिहासिक खेळी संपली.

The New Glory of One-Day Cricket

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *