पिंपळगावला वीज कोसळून गाय-वासरू ठार
नाशिक : प्रतिनिधी
आर्द्रा नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी चांदवड, निफाड, येवला, सिन्नर, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यात पावसाने हजेरी लावली. अद्याप पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने बळीराजाला जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. या पावसामुळे उकाडा काहीसा कमी झाला. दरम्यान, पिंपळगाव नजीक (ता. निफाड) शिवारात वीज कोसळून गाय-वासरू जागीच ठार झाले.
चांदवड शहरात शिवाजी चौक परिसरात मुख्य रस्त्यांवर पाण्याचा निचरा न झाल्याने रस्त्यांनी अक्षरशः नदीचे स्वरूप धारण केले होते कॉलेज रोडवरील रेणुका कॉम्प्लेक्स परिसरात पावसाचे पाणी थेट काही दुकानांमध्ये शिरल्याने व्यापार्यांचे मोठे नुकसान झाले. येवला शहरात पावसामुळे गंगा दरवाजा परिसरातील भुयारी गटारीची दुरवस्था समोर आली. पावसाचे पाणी तुंबल्यामुळे गटारीचे घाण पाणी थेट रस्त्यावरून वाहत होते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती.
सिन्नर तालुक्यातील वडांगळीसह परिसरात पावसाने हजेरी लावली. मात्र पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा कायम आहे. त्र्यंबकेश्वर शहरात सलग चार तास सुरू असलेल्या पावसामुळे विकासकामांमुळे सर्वत्र चिखल राडा झाला. सोमवार असल्याने भाविकांची गर्दी अधिक होती, पावसात उभे राहून घोंगट्याचा आधार घेत भाविकांनी दर्शन घेतले. इगतपुरी तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने भात पिकाला नवसंजीवनी मिळणार असून, शेती कामांना वेग येणार आहे. निफाड तालुक्यातील वाकद, शिरवाडे, देवगाव, कोळगाव, कानळद, रुई, धानोरे, विंचूर, डोंगरगाव, नांदगाव, धारणगाव, खेडले झुंगे, सारोळेथडी, नांदूरमधमेश्वर, दिंडोरी तास, तारुखेडले, तामसवाडी, करंजी खुर्द, ब्राह्मणवाडे, खानगाव थडी आणि म्हाळसाकोरे परिसरात झालेल्या पावसामुळे शेतकर्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. मात्र, पेरणीयोग्य पावसाची अपेक्षा कायम आहे.
Rain makes an appearance in the district on the very first day of the ‘Ardra’ Nakshatra.