सिडकोतील रस्त्यांवर पाणीच पाणी

वाहनचालकांची उडाली तारांबळ

सिडको : प्रतिनिधी
गेल्या अनेक दिवसांपासून मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या नाशिककरांना मंगळवारी (दि. 23) सकाळपासून सुरू झालेल्या पावसाने मोठा दिलासा मिळाला.
उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना गारव्याचा अनुभव मिळाला असला, तरी हंगामातील पहिल्याच पावसाने शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले. सिडको, कामटवाडे, अंबड, उंटवाडी, मोरवाडी, गौळाणे, चुंचाळे, पाथर्डी फाटा, इंदिरानगर आदी परिसरात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
पावसाचे पाणी रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये साचल्यामुळे वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नव्हता. परिणामी अनेक ठिकाणी वाहतूक मंदावली, तर काही ठिकाणी किरकोळ अपघातांच्याही घटना घडल्याची माहिती नागरिकांनी दिली. दुचाकीस्वारांना विशेषतः मोठी कसरत करावी लागली. अनेक वाहनचालकांना पाण्यातून मार्ग काढताना वाहने बंद पडल्याने त्रास सहन करावा लागला.
पाथर्डी फाटा परिसरातील आव्हाड चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने संपूर्ण रस्ता जलमय झाला होता. त्यामुळे वाहनांची गती मंदावली आणि काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. तसेच पाथर्डी फाटा ते पाथर्डी गाव या मार्गावरील अंबिका हार्डवेअरसमोरील मुख्य रस्त्यावरही पावसाचे पाणी साचल्याने वाहनधारकांना सावधपणे वाहने चालवावी लागली.
दरम्यान, गुरू गोविंद सिंग महाविद्यालय परिसरात सुरू असलेल्या जलवाहिनीच्या कामामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण झाला होता. अनेक ठिकाणी गटारी व पावसाच्या पाण्याचा निचरा करणार्‍या वाहिन्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पाणी रस्त्यांवर साचल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मान्सूनच्या सुरुवातीलाच अशी परिस्थिती निर्माण झाल्याने आगामी काळात मुसळधार झाल्यास परिस्थिती गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Water everywhere on the roads in CIDCO.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *