रामकुंड, गोदाघाटावर आता 24 तास खाकीची नजर

भाविकांसाठी कडक सुरक्षाव्यवस्था तैनात

सिडको : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळा-2027 च्या तयारीला वेग आला आहे. लाखो भाविकांच्या संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर रामकुंड व गोदाघाट परिसरासाठी शहर पोलिसांनी विशेष सुरक्षा आराखडा तयार केला आहे. घाट परिसरात सुरक्षा, गर्दी नियंत्रण आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
पंचवटी, सरकारवाडा आणि भद्रकाली पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातील विविध घाट आणि महत्त्वाच्या ठिकाणी पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. रामकुंड स्नानघाट, गौरी पटांगण, गांधी तलाव, टाकळेश्वर घाट, लक्ष्मीनारायण घाट तसेच गोदाघाट परिसरातील इतर संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेचे समन्वयन पंचवटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे. रामकुंड परिसरात चोवीस तास दंगल नियंत्रण पथक तैनात राहणार आहे. दिवस आणि रात्र अशा दोन्ही पाळ्यांमध्ये स्वतंत्र कर्मचारी कार्यरत राहतील. भाविकांची सुरक्षितता लक्षात घेऊन सीसीटीव्हीद्वारे देखरेख, गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन, महिला सुरक्षा आणि हरवलेल्या व्यक्तींच्या शोधासाठी विशेष यंत्रणा कार्यरत राहणार आहे. तसेच संशयास्पद हालचाली, पाकिटमारी, चोरी, महिलांची छेडछाड आणि इतर गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांनी विशेष सतर्कता बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत.
गोदा आरतीसह विविध धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी गर्दीचे योग्य नियोजन व्हावे यासाठी प्रवेश आणि निर्गमन मार्ग मोकळे ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. याशिवाय निर्भया पथक, महिला सुरक्षा पथक, बॉम्बशोधक व नाशक पथक, श्वान पथक तसेच जलसुरक्षा पथकेही सज्ज ठेवण्यात येणार आहेत.
ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती आणि हरवलेल्या बालकांसाठी विशेष मदत केंद्रांची व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. रामकुंड परिसर धार्मिकदृष्ट्या संवेदनशील असल्याने सर्व अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी दक्षता, संयम आणि तत्परता राखून कायदा व सुव्यवस्था कायम ठेवावी, असे निर्देश पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले आहेत.

Round-the-clock police vigil now at Ramkund and Goda Ghat.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *