मालेगाव कॅम्प परिसरातील घटना
मालेगाव : प्रतिनिधी
मालेगाव कॅम्प परिसरात दोन भामट्यांनी विश्वास संपादन करून तब्बल 21 लाख 15 हजार 721 रुपयांचे हिरे व सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना रविवारी पहाटे घडली. याप्रकरणी मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्यात अज्ञात दोघांविरुद्ध फसवणूक, विश्वासघात व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टिपरे कॉलनीतील मौक्तिक बंगल्यासमोरील रस्त्यावर रविवारी (दि. 22) पहाटे सुमारे 5.45 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी किशोरकुमार भगवान लोढा (70, रा. इन्कम टॅक्स कार्यालयामागे, मालेगाव कॅम्प) यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, पांढर्या रंगाच्या होंडा सिटी कारमधून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी नम्रपणे संवाद साधत फिर्यादी व त्यांच्या सहकार्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर बहाणा करून विश्वासाने त्यांच्याकडे सोपविण्यात आलेले मौल्यवान दागिने घेऊन आरोपींनी पोबारा केला.
चोरीस गेलेल्या मुद्देमालात 2.01 कॅरेट कट अँड पॉलिश्ड हिरे जडविलेली सुमारे 15.58 लाख रुपयांची सोन्याची अंगठी, एकमुखी रुद्राक्ष असलेली 3.50 लाख रुपयांची सोन्याची चेन, तसेच पुखराज खडा जडविलेली 2.80 लाख रुपयांची सोन्याची अंगठी यांचा समावेश आहे. एकूण चोरीचा मुद्देमाल 21 लाख 15 हजार 721 रुपये इतका आहे.
दरम्यान, आरोपींपैकी एक जण 30 ते 35 वर्षे वयोगटातील तर दुसरा 45 ते 50 वर्षे वयोगटातील असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोघेही अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. पी. निकम करीत आहेत.
Round-the-clock police vigil now at Ramkund and Goda Ghat.