नाशिक : प्रतिनिधी
दिवंगत ज्येष्ठ मराठी नाटककार प्रा. वसंत कानेटकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एचपीटी आर्ट्स अँड आरवायके सायन्स महाविद्यालयातर्फे सोमवार, दि. 21 मार्च 2022 रोजी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याचवेळी महाविद्यालयाच्या शतकमहोत्सवाचा शुभारंभ होणार आहे.
प्रा. कानेटकर हे एचपीटी महाविद्यालयात प्राध्यापक होते. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ हे त्यांचे गाजलेले नाटक आजही नाट्यरसिकांच्या चर्चेत असते. प्रा. कानेटकर यांनी साहित्य आणि नाट्य क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा उचित गौरव करण्यासाठी एचपीटी महाविद्यालयाच्या वतीने त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा सांगता सोहळा आयोजित केला आहे. या सोहळ्यात प्रा. कानेटकर यांच्या जीवनावर आणि त्यांच्या साहित्य व नाट्यक्षेत्रातील योगदानावर विशेष चित्रफीत दाखविण्यात येणार आहे. याबरोबर प्रा. कानेटकर यांच्या स्नुषा अंजली कानेटकर या विशेष मनोगत व्यक्त करणार आहेत. महाविद्यालयाच्या निवडक पाच विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी यांनी दिली.
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या प्रिं. टि. ए. कुलकर्णी हॉलमध्ये सकाळी 10.30 वाजता होणार्या या समारंभाचे अध्यक्षस्थान सोसायटीचे सचिव डॉ. मो. स. गोसावी भूषविणार असून, प्रा. कानेटकर यांच्या स्नुषा अंजली कानेटकर यांचा सत्कार सोसायटीच्या मानव संसाधन संचालिका डॉ. दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी एचपीटी महाविद्यालय आणि प्रा. कानेटकर या विषयावर डॉ. उल्हास रत्नपारखी विशेष विवेचन करणार आहेत. कार्यक्रमाचे संयोजन डॉ. वृन्दा भार्गवे यांनी केले आहे.
या कार्यक्रमास विभागीय सचिव डॉ. राम कुलकर्णी, डॉ. आर. पी. देशपांडे आदी उपस्थित राहणार आहेत. उपस्थित राहण्याचे आवाहन उपप्राचार्य डॉ. प्रणव रत्नपारखी, उपप्राचार्या डॉ. मृणालिनी देशपांडे यांनी केले आहे