नाशिक : प्रतिनिधी
परंपरेनुसार फाल्गुन महिन्यात पौर्णिमेला होळी साजरी करण्यात येते. होळीच्या दिवशी होलिका दहन करत वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टी आत्मसात करत नवीन सुरुवात करण्यात आली. ‘होळी रे होळी, पुरणाची पोळी’ म्हणत शहरात उत्साहात होळीचा सण साजरा करण्यात आला.
संध्याकाळच्या वेळी होळी पेटवत होलिकेला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. तसेच होळीत नारळाची आहुती देण्यात आली. होळीत भाजल्यानंतर खोबर्याचा प्रसाद वाटप करण्यात आला. होळी पेटवल्यानंतर बोंब मारण्याचीही प्रथा आहे. शहरात ठिकठिकाणी सार्वजनिक होळी पेटविण्यात आली. संस्था, संघटनांसह सोसायटीतील नागरिकांनी एकत्र येत होलिकोत्सव साजरा केला. शहरातील सर्वच भागात होळीचा सण साजरा करण्यात आला. आज धुळवड आहे. मात्र, नाशिक शहरात परंपरागत रंगपंचमी साजरी करण्यात येते. मात्र अनेक जण होळीची राख अंगाला लावत धुळवड साजरी करतात. मराठी वर्षातला शेवटचा सण असल्याने होळी सणाला विशेष महत्त्व आहे.