डोकेदुखी आणखी वाढली

मणिपूरमध्ये बहुसंख्य मैतेई आणि आदिवासी कुकी-झो समुदायांमध्ये तीव्र वांशिक संघर्ष 3 मे 2023 रोजी सुरू झाला. मणिपूर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मैतेई समुदायाचा अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश करण्याच्या मागणीवर विचार करण्याचे निर्देश दिले होते. आदिवासींचा विरोध : या निर्णयाच्या विरोधात 3 मे 2023 रोजी ऑल ट्रायबल स्टुडंट्स युनियन ऑफ मणिपूर या आदिवासी संघटनेने आदिवासी एकता मोर्चा (Tribal Solidarity March) काढला. या मोर्चानंतर चुराचंदपूर जिल्ह्यात दोन्ही समुदायांमध्ये हिंसाचार भडकला. मैतेई समुदाय आधीच राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या प्रबळ आहे. त्यांनाही आदिवासी दर्जा मिळाल्यास आपल्या वाट्याचे आरक्षण, सरकारी नोकर्‍या आणि शैक्षणिक संधी हिरावल्या जातील, अशी भीती कुकी आणि नागा या आदिवासी समुदायांना वाटली होती आणि वाटत असली तरी नागा आणि कुकी या दोन आदिवासी जमातींत सख्य नाही. मणिपूरच्या एकूण भूभागापैकी 90 टक्के डोंगराळ भाग आहे, जिथे कुकी आणि नागा जमाती राहतात. उर्वरित 10 टक्के इम्फाळ खोर्‍यात मैतेई समुदाय राहतो. सध्याच्या कायद्यानुसार मैतेई लोकांना डोंगराळ भागात जमीन खरेदी करण्यास बंदी आहे. त्यांना आदिवासी ‘एसटी’ दर्जा मिळाला तर ते आमच्या हक्काच्या डोंगराळ भागात जमिनी खरेदी करतील आणि आपल्याला विस्थापित करतील, अशी भीती आदिवासींना आहे, पण त्यांच्यात ऐक्य नाही. गेल्या काही आठवड्यांत मणिपूरमध्ये कुकी आणि नागा या दोन जमातींमधला संघर्ष इतका टोकाला गेला आहे की, प्रतिस्पर्धी जमातीच्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असताना जमाव येऊन अडथळे आणतो. दि. 15 जून 2026 रोजी सुरक्षा दलांसमोर हे नवीन आव्हान उभे राहिले. कांगपोकपी जिल्ह्यात झालेल्या हल्ल्यात तीन कुकी तरुण जखमी झाले. त्यांना इम्फाळच्या रुग्णालयात दाखल केले, तेव्हा तिथे जमाव जमला. सुरक्षा दलांना लाठीमार आणि अश्रुधुराचा वापर करून जमाव पांगवावा लागला. कुकींची शिखर संघटना असलेल्या कुकी इनपी मणिपूरने या हिंसाचारासाठी नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल ऑफ नागा (एनएससीएन) या संघटनेच्या गटांना जबाबदार धरले. परिस्थिती आणखी बिघडली जेव्हा 17 जूनच्या पहाटे त्या तिघांना प्रादेशिक इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस संस्थेतून इम्फाळच्या दक्षिणेला सुमारे 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या चुराचांदपूर मेडिकल कॉलेजमध्ये हलवावे लागले. चुराचांदपूर हा कुकी-झो समाजाचा बालेकिल्ला आहे. दोन जमातींत मोठ्या प्रमाणावर हिंसाचार सध्या नसला तरी छोट्या छोट्या घटना घडत आहेत. आदिवासी भागांत जिथे ख्रिश्चन बहुसंख्य आहेत, तिथे चर्चच्या धर्मगुरूंसह अनेकांचे अपहरण आणि खून झाले आहेत. पोलिस आणि निमलष्करी दल गुन्हेगारांना पकडतील, यावर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे 4 फेब्रुवारी 2026 रोजी सत्तेवर आलेल्या नव्या सरकारला एकापाठोपाठ एक प्रकरणे राष्ट्रीय तपास संस्थेकडे सोपवावी लागत आहेत. दि. 9 जून रोजी सेनापती जिल्ह्यात जवळपास एक महिना ओलीस ठेवलेल्या 14 कुकींना नागा सशस्त्र गटांनी सोडलं. यामुळे परिस्थिती निवळेल असं वाटत होते, पण 10 जून रोजी धक्कादायक बातमी आली. 13 मे रोजी अपहरण झालेल्या सहा नागा ग्रामस्थांचे मृतदेह सापडले. यात दोन पाद्री होते. उर्वरित चार मृतदेह इतके विद्रूप केले गेले होते की, ओळखणंही कठीण होतं – असं नागांची शिखर संघटना युनायटेड नागा कौन्सिलने (यूएनसी) म्हटले. या संघटनेने कुकी नॅशनल फ्रंटला दहशतवादी संघटना घोषित करण्याची मागणी यूएनसीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. तसेच केंद्राने 25 कुकी-झोमी गटांशी केलेला ‘सस्पेन्शन ऑफ ऑपरेशन्स’ करार रद्द करण्याचीही मागणी पुन्हा केली. दि.
3 मे 2023 रोजी वांशिक हिंसाचार उसळला तेव्हापासून मैतेई विरुद्ध कुकी-झो हाच मुख्य संघर्ष होता. नागा जमात तोपर्यंत तटस्थ होती. पण, गेल्या चार-पाच आठवड्यांत जमिनीच्या मालकीवरून कुकी आणि नागा यांच्यातला जुना वाद पुन्हा उफाळला आहे आणि सरकारची डोकेदुखी आणखी वाढली आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार असूनही मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित होणे अवघड आहे. आदिवासी विरुद्ध मैतेई संघर्ष जितका पारंपरिक आहे, तितकाच नागा-कुकी संघर्ष आहे. मे 2023 पासून सुरू असलेल्या वांशिक हिंसाचारामुळे आणि राजकीय अस्थिरतेमुळे तेव्हाचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी 9 फेब्रुवारी 2025 रोजी राजीनामा दिला होता, त्यानंतर राज्यात केंद्र सरकारने राष्ट्रपती राजवट लागू केली होती. नवीन मंत्रिमंडळात वांशिक संतुलन राखण्यासाठी नेमचा किपजेन (कुकी समुदाय) आणि लोसी दिखो (नागा समुदाय) यांची उपमुख्यमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मणिपूरचे नवनियुक्त मुख्यमंत्री युमनाम खेमचंद सिंह हे मैतेई समुदायाचे आहेत. त्यांना एक मवाळ किंवा मध्यममार्गी मैतेई नेता म्हणून ओळखले जाते. मैतेई-कुकी वांशिक हिंसाचारानंतर दोन्ही समुदायांमध्ये संवाद प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. फेब्रुवारी 2026 मध्ये त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. वांशिक संतुलन राखण्यासाठी त्यांच्या मंत्रिमंडळात नागा आणि कुकी समुदायाचे उपमुख्यमंत्रीदेखील नियुक्त करण्यात आले आहेत. असे असूनही नागा आणि कुकी यांच्यात संघर्ष उफाळला आहे. मैतेई, कुकी आणि नागा या प्रमुख समुदायांमधील अविश्वास आणि संघर्ष ही नवीन बाब नाही. अलीकडील घटनांनी वांशिक तणावाला आणखी धोकादायक वळण दिले आहे. सुरुवातीला मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये केंद्रित असलेला संघर्ष आता नागा आणि कुकी समुदायांपर्यंत पोहोचला आहे. कुकी, नागा आणि मैतेई आपापल्या भूमिकांवर ठाम आहेत. हेच केंद्र व राज्य अशा दोन्ही सरकारांसमोर आव्हान आहे.

The headache worsened further.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *