एचएसआरपी नंबर प्लेट नसणार्यांची खैर नाही; आरटीओ शिंदे यांचा इशारा
पंचवटी : सुनिल बुनगे
राज्यात 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट अर्थात, एचएसआरपी बसविण्याची अंतिम मुदत 30 जून रोजी संपली. मुदत संपताच नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयाने 1 जुलै रोजी पहिल्याच दिवशी शहरात धडक मोहीम राबवून तब्बल 34 वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. वाहनधारकांनी वारंवार दिलेल्या मुदतवाढीकडे दुर्लक्ष केल्यामुळे आरटीओने आता थेट रस्त्यावर उतरून कारवाईचा बडगा उगारला आहे. दरम्यान, ज्या वाहनांवर अद्याप एचएसआरपी नंबर प्लेट नसेल, त्यांच्यावर आता संपूर्ण जिल्हाभरात तीव्र मोहीम उघडण्यात येणार असल्याचा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी दिला आहे.
परिवहन विभागाने 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या वाहनांसाठी 30 जून 2026 ही अंतिम मुदत दिली होती. यापूर्वी वाहनधारकांना नंबर प्लेट बदलण्यासाठी अनेकदा मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, तरीही हजारो वाहनधारकांनी याकडे दुर्लक्ष केले. अखेर 1 जुलैपासून पोलीस आणि परिवहन विभागाच्या संयुक्त विद्यमाने मोटार वाहन कायद्यानुसार कडक कारवाईचे सत्र सुरू करण्यात आले आहे.
ज्या वाहनांना एच.एस.आर.पी. नंबर प्लेट नसेल, त्यांना केवळ दंडालाच सामोरे जावे लागणार नाही, तर आरटीओशी संबंधित महत्त्वाच्या कामांवरही निर्बंध आणले आहेत. या सेवांवर राहणार बंदी राहणार आहे. त्यात वाहनाचे हस्तांतरण, पत्ता बदल करणे, कर्जबोजा नोंदवणे किंवा रद्द करणे, वाहनाची पुनर्नोंदणी, वाहनातील तांत्रिक बदल आणि परवाना नूतनीकरण आदी. थोडक्यात काय तर, जर तुमच्या वाहनाला अजूनही सरकारी नियमाप्रमाणे हायसिक्युरिटी नंबर प्लेट नसेल, तर तुमचे वाहन रस्त्यावर धावणे तर कठीण होईलच, पण कागदोपत्री कामेही पूर्णपणे ठप्प होणार आहेत. त्यामुळे वाहनधारकांनी तातडीने ही नंबर प्लेट बसवून घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन विभागाच्या प्रशासनाने केले आहे.
21 अधिकारी कारवाईत सहभागी
ज्या वाहनांना एच.एस.आर.पी.नंबर बसविलेली नसेल अशा वाहनांवर कारवाई करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाचे इंटरसेप्टर वाहने, रडार वाहने आणि वायुवेग पथके सज्ज झाली आहेत. या पथकांद्वारे 21 अधिकारी सहभागी झाले आहेत.
परिवहन विभागाने एच.एस.आर.पी. नंबर प्लेट बसविण्यासाठी वेळोवेळी मुदत दिली होती.तरीही अनेक वाहन चालकांकडून त्याकडे दुर्लक्ष केले गेले असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे 1 जुलैपासून एच.एस.आर.पी. नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. यापुढे ही कारवाई केवळ शहरांतर्गत न राहता जिल्हाभरात करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या वाहनचालकांनी एच.एस.आर.पी. नंबर प्लेट बसविलेली नसेल त्यांनी नंबर प्लेट बसवून घेऊन दंडात्मक कारवाई टाळावी.
– प्रदीप शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नाशिक