मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू

चार जणांचे निलंबन
मुंबई :
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मलनिस्सारण प्रचालन खात्यामार्फत गुरुवारी दुपारी कुर्ला साकीनाका येथील खैरानी मार्गालगत मनुष्य प्रवेशिकेवर ‘संरक्षक जाळी’ बसविण्याची कार्यवाही सुरू असताना एका व्यक्तीचा संबंधित मॅनहोलमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला. असलम इसाक शेख (वय 55) असे त्याचे नाव आहे. भरपावसात सुरू असलेल्या या कामामुळे या घटनेची महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी गंभीर दखल घेत ‘एल’ विभागाचे सहायक आयुक्त धनाजी हेर्लेकर यांच्यासह सहायक/दुय्यम अभियंता दीपक चौगुले, कनिष्ठ अभियंता अभिजित चौगुले, सहायक अभियंता उत्तम पाटील यांना चौकशीसापेक्ष निलंबित केले आहे. सुरक्षेच्या नियमांबाबत कामात हलगर्जीपणा करणार्‍या संबंधित कंत्राटदारास काळ्या यादीत टाकण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत. या दुर्दैवी घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी आणि महानगरपालिका क्षेत्रात अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी गठित करण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेतील मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 10 लाख रुपयांचे अर्थसहाय्य करण्याचे महापौर रितू तावडे यांनी जाहीर केले आहे.

Man dies after falling into a manhole.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *