त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर दिंडीत 24 तास आरोग्यसेवा
नाशिक : प्रतिनिधी
संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराज पंढरपूर पायी पालखी दिंडी सोहळ्यात चालणार्या हजारो वारकरी, संत आणि भाविकांच्या सुदृढ आरोग्यासाठी आणि सुखाच्या वारीसाठी आडगाव येथील ‘मविप्र रुग्णालय’ यंदाही माउलींच्या सेवेत धावून आले आहे.
त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर अशा संपूर्ण वारीच्या प्रवासात मविप्र रुग्णालयाचे सुसज्ज आरोग्य पथक 24 तास कार्यरत राहणार असल्याची माहिती मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस नितीन ठाकरे यांनी दिली.
मविप्र सरचिटणीस नितीन ठाकरे, सर्व पदाधिकारी, संचालक आणि शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानेश्वर लोखंडे, अधिष्ठाता डॉ. सुधीर भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्तुत्य उपक्रम राबविला जात आहे. वारीमध्ये वारकर्यांना पायाला पडणारे फोड, थकवा किंवा इतर कुठल्याही आरोग्याच्या समस्येला तोंड द्यावे लागू नये म्हणून एक सुसज्ज रुग्णवाहिका 29 जूनपासून वारीमध्ये दाखल झाली आहे. या फिरत्या आरोग्य पथकात प्रशिक्षित डॉक्टर, रुग्ण सहायक, रुग्णवाहिका चालक यांच्यासह मुबलक औषधसाठा आणि प्रथमोपचार सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. सुधीर भामरे यांनी दिली. मविप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, संचालक लक्ष्मण लांडगे, माजी संचालक प्रल्हाद गडाख, रामदास लांडगे, माधव मोहन, रामदास उगले, शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानेश्वर लोखंडे, अधिष्ठाता डॉ. सुधीर भामरे आणि उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. मंगेश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत मविप्र रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभाग प्रवेशद्वारावर रुग्णवाहिकेचे पूजन करून पथकाला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
या सोहळ्याला कम्युनिटी मेडिसीनचे प्राध्यापक डॉ. अशोक वनकुद्रे, डॉ. सुनीता पवार, इंटर्नशिप विभागप्रमुख डॉ. शीतल पाटील, डॉ. स्निग्धा ठाकूर व पथकातील सर्व इंटर्न डॉक्टर, ट्रान्स्पोर्ट विभागाचे किशोर गायकवाड, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते प्रवीण वाघ, वाहनचालक सुनील पवार आणि सहायक सेवक दीपक जाधव यांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
मोफत आरोग्य तपासणी-उपचार
त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर या वारी मार्गावर मविप्र रुग्णालयाचे हे पथक वारकर्यांच्या सेवेत दिंडीसोबत राहणार आहे. औषधोपचारांनी सुसज्ज असलेली विशेष रुग्णवाहिका, 13 प्रशिक्षित डॉक्टर्स, रुग्ण सहाय्यक आणि वाहनचालक असे हे आरोग्य पथक 24 तास अलर्ट राहणार आहे. प्रवासात वारकर्यांची मोफत आरोग्य तपासणी व आवश्यक उपचार केले जाणार आहेत.
‘MVP’s Mobile Health Unit’ for Warkaris