भारताची एकता आणि प्रगतीसाठी समर्पित जीवन

आज 6 जुलै, राष्ट्रवाद आणि
निःस्वार्थ सेवेचा आदर्श मानणार्‍या, त्यांची जपणूक करणार्‍या सर्व लोकांसाठी आजचा दिवस विशेष आहे. आज डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांची 125 वी जयंती. त्यानिमित्त….

भारत मातेच्या सेवेप्रति कटिबद्धता आणि धैर्य यांचे ते कालातीत मूर्तिमंत उदाहरण आहेत. आधुनिक भारताच्या इतिहासात, असे अगदी कमी लोक आहेत, ज्यांच्यात बुुद्धिमत्ता, सार्वजनिक सेवाभाव आणि नैतिक दृढनिश्चय यांचा संगम आढळतो. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी त्यांच्यापैकीच एक. त्यांचे पिता सर आशुतोष मुखर्जी, त्या काळातील एक आघाडीचे शिक्षणतज्ज्ञ आणि प्रखर बुद्धिवादी होते. त्यांच्यातील विवेकाने त्यांना देशसेवा आणि त्यागाचा मार्ग दाखवला. या प्रवासात त्यांना वैयक्तिक आयुष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागला, यात अगदी त्यांचं बाळ आणि नंतर त्यांच्या पत्नीचे झालेले देहावसान, मात्र, अशा दु:खांनी त्यांचा दृढनिश्चय वाढवला.
डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांचा आदर्श गुण सांगायचे ठरले तर, अखंड भारताप्रति त्यांची निष्ठा! फाळणीच्या गदारोळातही पश्चिम बंगाल हा भारताचा अविभाज्य घटक राहील, यासाठी ते पाय घट्ट रोवून उभे राहिले. काही वर्षांनी ते जम्मू-काश्मीरला गेले. तिथे झालेला तुरुंगवासही त्यांना त्यांच्या ध्येयापासून परावृत्त करू शकला नाही. मात्र, याच तुरुंगवासात त्यांचा मृत्यू झाला. आचार्य विनोबा भावे एकदा म्हणाले होते की, ज्या तत्त्वावर मुखर्जी यांचा दृढविश्वास होता, त्यासाठी त्यांनी स्वतःचे बलिदान दिले. या घटनेनंतर अनेक वर्षांनी कलम 370 आणि अनुच्छेद 35 (अ) हटवणे (2019 चा कायदा), ही त्यांच्या बलिदानाला दिलेली
सर्वोच्च मानवंदना होती. डॉ. मुखर्जी यांनी कायमच भारताला आणि भारतीय मूल्यांना प्रथमस्थानी ठेवले. ते कलकत्ता विद्यापीठाचे सर्वांत तरुण कुलगुरू बनले. आपल्या कार्यशैलीद्वारे त्यांनी सकारात्मक बदल घडवून आणले. शिक्षणतज्ज्ञांच्या परिषदेला संबोधित करताना ते म्हणाले होते की, शैक्षणिक संस्थांकडे संभाव्य कारकून आणि अल्प वेतनावर काम करणारे कर्मचारी तयार करणारे कारखाने म्हणून पाहणे चुकीचे आहे. नगरपालिका, प्रांतीय आणि केंद्रीय विधिमंडळे यांसारख्या आपल्या स्वशासित संस्थांना नेतृत्व देण्यास सक्षम असलेले, तसेच वित्तीय, व्यापारी आणि औद्योगिक अशा जीवनाच्या विविध क्षेत्रांतील कामकाजाचे संचालन करू शकणारे विद्यार्थी घडविणे आवश्यक आहे.
त्यांनी क्रीडा, शिक्षक प्रशिक्षण आणि विद्यार्थी कल्याण यांसारख्या क्षेत्रांकडेही विशेष लक्ष वेधले. 24 जानेवारी हा दिवस विद्यापीठाचा स्थापना दिन म्हणून साजरा करण्याची परंपरा सुरू केली. विद्यापीठासाठी गीत रचण्याची विनंती त्यांनी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना केली होती. त्यांनी भारतीय जनसंघाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. त्या काळात काँग्रेस पक्षाचे सगळीकडे वर्चस्व असताना, भारताच्या प्रगतीसाठी आपल्या सांस्कृतिक मुळांशी जोडलेले राहून पर्यायी आवाज उभा राहणे अधिक आवश्यक असल्याचे त्यांना वाटत होते. म्हणूनच त्या पक्षाचे निवडणूक चिन्ह मातीचा दिवा होते. भारताचे पहिले उद्योग आणि पुरवठामंत्री म्हणून डॉ. मुखर्जी यांचा कार्यकाळ हा विकासाविषयी अत्यंत व्यापक आणि मानवतावादी दृष्टिकोन असलेल्या एका नेत्याचे दर्शन घडवतो. नव्याने स्वतंत्र झालेल्या राष्ट्राचा सन्मान, संधी आणि आत्मविश्वास पुनर्स्थापित करण्याचे साधन म्हणून त्यांनी उद्योगांकडे पाहिले. दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन, सिंद्री खत प्रकल्प आणि भक्कम औद्योगिक धोरण यांसारख्या अग्रणी उपक्रमांद्वारे आधुनिक औद्योगिक भारताचा पाया रचत असतानाच, भारताच्या पारंपरिक सामर्थ्याकडे दुर्लक्ष होणार नाही, याचीही त्यांनी खात्री केली.
याठिकाणी मला वैयक्तिक अनुभव सांगायचा आहे. आत्मनिर्भरतेच्या स्पष्ट दृष्टिकोनातून डॉ. मुखर्जी यांनी प्रयत्नपूर्वक उभारलेल्या सिंद्री खत प्रकल्पाकडे अनेक दशके देशाचे नेतृत्व करणार्‍यांनी दुर्लक्ष केले. मला याचा अभिमान वाटतो की, आमच्या सरकारला या परंपरेच्या पुनरुज्जीवनात योगदान देण्याची संधी मिळाली. त्या कार्यक्रमात उपस्थित राहणे हा खरोखरच सर्वांत विशेष क्षणांपैकी एक होता.
डॉ. मुखर्जी यांनी लोकशाही मूल्यांचे प्रतिनिधित्व केले होते. सुरुवातीच्या काळात राष्ट्रउभारणीचे कार्य राजकीय मतभेदांच्या पलीकडचे आहे, असा विश्वास बाळगून ते पं. नेहरूंच्या मंत्रिमंडळात सामील झाले. 75 वर्षांपूर्वी पं. नेहरूंनी पहिले घटनादुरुस्ती विधेयक आणले, जे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर थेट आघात करणारे होते. डॉ. मुखर्जी त्याच्या सवार्ंत कट्टर विरोधकांपैकी एक होते. ज्यांनी पहिले घटनादुरुस्ती विधेयक आणले, त्यांनीच 1975 मध्ये आणीबाणी लादली. 1943 मध्ये जेव्हा बंगालमध्ये भीषण दुष्काळ पडला, तेव्हा डॉ. मुखर्जींनी पीडितांच्या सेवेत झोकून दिले. त्यांनी ‘पंचशेर मनवंतर’ नावाचे पुस्तकही लिहिले, ज्यात त्यांनी आपली व्यथा मांडली. देश ‘विकसित भारता’च्या ध्येयाकडे वाटचाल करत असताना, त्यांनी ज्या मजबूत, एकसंध, आत्मविश्वासी आणि करुणामय भारतावर दृढविश्वास ठेवला होता, तो घडवण्यासाठी दररोज प्रयत्न करणे, हीच त्यांच्या स्मृतीला वाहिलेली सर्वोत्तम आदरांजली आहे.

A life dedicated to India’s unity and progress.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *