पावसामुळे पंचवटी परिसरात विविध ठिकाणी वृक्ष पडले
पंचवटी : प्रतिनिधी
हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार सोमवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे पंचवटीत अनेक रस्त्यांवर पाणी साचले होते. याशिवाय, परिसरात हिरावाडी भाऊसाहेबनगर, अयोध्यानगर, सुरती फरसाण, सिद्धेश्वरनगर, तसेच मखमलाबाद रोड भागातही कडुनिंब, उंबर, गुलमोहर यांसारख्या वृक्षांच्या फांद्या पडल्या तर काही ठिकाणी वृक्ष पडल्याच्या घटना घडल्या.
तसेच प्रभाग क्रमांक एकमधील किशोर सूर्यवंशी मार्गावरील शिवसमर्थनगर येथे कडुनिंबाचे झाड कोसळले होते. दरम्यान, हिरावाडी परिसरातील एका स्कूल बसवर वृक्ष पडल्याने तिचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अयोध्यानगरला एका उभ्या एम.एच.15 ए.के. 1690 या स्कूल व्हॅनवर झाडाची फांदी पडली. सुदैवाने शाळांना सुट्टी असल्याने व्हॅनमध्ये कोणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली. रात्रीपासून हजेरी लावलेल्या पावसाने कळसकरनगर, जुना आडगाव नाका, तसेच वरदविनायक परिसरातील रस्त्यावर पावसाचे पाणी साचून तळे तयार झाले होते. प्रभाग क्रमांक तीनमधील वेगवेगळ्या भागात चार वृक्ष कोसळल्याची घटना घडल्यानंतर स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, नगरसेविका प्रियंका माने यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पालिकेच्या संबंधित विभागाला कळवून पडलेल्या वृक्षांच्या फांद्या व वृक्ष बाजूला काढण्याचे काम केले. प्रभाग क्रमांक एकमधील किशोर सूर्यवंशी मार्गावरील शिवसमर्थनगर येथे कडुनिंबाचे झाड कोसळले होते. सदर बाब परिसरातील नागरिकांनी नगरसेवक प्रवीण जाधव यांना संपर्क साधत सांगितली. नगरसेवक जाधव यांनी तात्काळ संबंधित विभागास कळविले आणि सदर उन्मळून पडलेले कडुनिंबाचे झाड काढून घेतले.
प्रभाग सहामधील गामणे मळ्याजवळही वृक्ष कोसळला
प्रभाग क्रमांक सहामधील गामणे मळा परिसरात झाड कोसळल्याची माहिती मिळताच प्रभाग सभापती रोहिणी पिंगळे, नगरसेवक प्रमोद पालवे, वाळू काकड, नगरसेविका चित्रा तांदळे यांनीही भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. संबंधित अधिकार्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत झाड हटवून आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना दिल्या.
Tree falls on school van in Hirawadi