निफाड तालुक्यातील प्रकार; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
निफाड : तालुका प्रतिनिधी
भोंदूबाबा, बनावट शासकीय योजना आणि दामदुप्पट परताव्याच्या घटना ताज्या असतानाच, आता निफाड तालुक्यात लकी ड्रॉच्या आमिषाने हजारो नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी निफाड पोलीस ठाण्यात सहा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उगाव येथील शेतकरी शिवलाल भाऊसाहेब ढोमसे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. संशयितांनी स्वतःची ओळख श्री साई एंटरप्रायजेसचे प्रतिनिधी म्हणून करून दिली होती. ही संस्था गरीब विद्यार्थी व अनाथाश्रमासाठी काम करत असल्याचे सांगून त्यांनी नागरिकांना दीड हजार रुपयांचे लकी ड्रॉ कूपन विकले. यासाठी मोटारसायकल, बुलेट, ट्रॅक्टर, स्कॉर्पिओ, शिलाई मशीन, मोबाइल अशी आकर्षक बक्षिसे देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. या आमिषाला बळी पडून उगाव, निफाड, चांदवड, येवला परिसरातील हजारो नागरिकांनी ही तिकिटे खरेदी केली. 5 जुलै रोजी निफाड-विंचूर महामार्गावरील श्रीराम लॉन्समध्ये या सोडतीचे आयोजन केले होते. मात्र, तिथे उपस्थित सुमारे दोन हजार नागरिकांपैकी एकालाही बक्षीस मिळाले नाही. नागरिकांनी याबाबत जाब विचारला असता आयोजकांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन तेथून पलायन केले. याप्रकरणी माउली खलाडे, श्रीकांत शिंदे, मंगेश लवटे, सुनील दराडे, किशोर दराडे व शांताराम दिघोळे यांच्याविरुद्ध फसवणूक आणि लॉटरी नियमन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. नागरिकांनी कोणत्याही आकर्षक योजनांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Thousands of citizens defrauded with the lure of a lucky draw.