देवळ्यात 14 लाख 92 हजारांचा गुटखा जप्त

रिमोट दाबताच नंबरप्लेटवर काळा पडदा; आरोपीला अटक

देवळा : प्रतिनिधी
तालुक्यातील विठेवाडी येथील आहेर वस्तीजवळ बुधवारी (दि. 8 ) रात्री ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे प्रतिबंधित पानमसाला व सुगंधित तंबाखूच्या तस्करीचा पर्दाफाश झाला. संशयास्पद हालचाली करणारी इर्टिगा कार ग्रामस्थांनी अडवून देवळा पोलिसांच्या ताब्यात दिली. या कारवाईत पोलिसांनी एकूण 14 लाख 92 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, एका आरोपीला अटक केली आहे, तर मुख्य तस्कर फरार झाला आहे.
नाशिक विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी चेतन परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित वाहनातून (एमएच-41-बीएल-9848) मोठ्या प्रमाणावर विमल पानमसाला आणि व्ही-1 तंबाखू पाकिटांचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला. या मालाची किंमत 4 लाख 92 हजार 200 रुपये असून, वाहतुकीसाठी वापरलेली 10 लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी इर्टिगा कारही पोलिसांनी जप्त केली आहे.
या कारवाईत सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे गुटखा वाहतुकीसाठी वापरलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान! पोलिसांना चकवा देण्यासाठी वाहनाच्या पुढील व मागील नंबर प्लेटवर रिमोटद्वारे नियंत्रित होणारा काळा पडदा बसविण्यात आला होता. रिमोटचे बटण दाबताच काही क्षणांत नंबर प्लेट पूर्णपणे झाकली जात होती. यामुळे पोलीस, परिवहन विभाग आणि सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची दिशाभूल करून ही तस्करी सुरू होती.
या प्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनय देवरे, पोलीस हवालदार नितीन बाराहाते, राहुल शिरसाठ, दिलीप सोनवणे, श्रावण शिंदे पुढील तपास करीत आहेत.

Gutkha worth ₹14.92 lakh seized in Deola.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *