दूध भेसळ प्रकरणात बड्या माशाला अभय?

प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची बैरागी यांची मागणी

सिन्नर : प्रतिनिधी
तालुक्यात उघडकीस आलेल्या कथित दूध भेसळ प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब बैरागी यांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास विशेष तपास पथक तथा एसआयटीकडे सोपविण्याची मागणी केली आहे. तसेच स्थानिक अन्न व औषध प्रशासन अधिकार्‍यांच्या भूमिकेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, असे निवेदन त्यांनी अन्न व औषध प्रशासन आयुक्तांना दिले आहे.
सिन्नर तालुक्यात दूध भेसळीसाठी वापरल्या जाणार्‍या रासायनिक पावडरच्या अवैध व्यवहाराबाबत यापूर्वीही अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, संबंधित यंत्रणेकडून प्रभावी कारवाई न झाल्याने भेसळीचे प्रकार सुरूच राहिल्याचा आरोप बैरागी यांनी निवेदनात केला आहे. नाशिक विभागाच्या अन्न व औषध प्रशासनाने 4 जुलै रोजी तालुक्यातील चार ठिकाणी छापे टाकून सुमारे 8,392 किलो संशयित भेसळ साहित्य आणि 49 किलो खवा जप्त केला होता. या प्रकरणात एका वाहतूकदाराविरुद्ध गुन्हा दाखल झाला असला, तरी संपूर्ण रॅकेटमागील कथित मुख्य सूत्रधारावर अद्याप कारवाई झालेली नाही. जप्त साहित्याचा मालक आणि भेसळीच्या साखळीतील प्रमुख व्यक्तींना आरोपी करून त्यांच्यावर अन्न सुरक्षा व मानके कायदा तसेच भारतीय न्याय संहितेअंतर्गत कठोर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी बैरागी यांनी केली आहे. तपास स्थानिक पातळीवरील अधिकार्‍यांकडून काढून स्वतंत्र यंत्रणेकडे द्यावा, अशीदेखील मागणी केली आहे.

भेसळखोरांवर मेहेरनजर का?

दूध भेसळीसाठी वापरल्या जाणार्‍या पावडरची वाहतूक आणि साठवणूक करणार्‍यांवर कारवाई झाली असली, तरी या व्यवसायामागील कथित प्रमुख व्यक्तीवर कारवाई होत नसल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापूर्वीही संबंधित व्यक्तीवर कारवाया झाल्याची चर्चा असताना तो पुन्हा सक्रिय कसा राहतो, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. सार्वजनिक आरोग्याशी संबंधित या गंभीर प्रकरणात प्रशासनाने संपूर्ण सत्य बाहेर आणावे, अशी मागणी जोर धरत आहे.

Is a ‘big fish’ being shielded in the milk adulteration case?

प्रकरणात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *