– सुनील बुनगे
महाराष्ट्राच्या परिवहन क्षेत्राला आधुनिकतेची आणि सुरक्षेची नवी दिशा देणारे धडाडीचे अधिकारी, राज्याचे सहपरिवहन आयुक्त भरत कळसकर नुकतेच 31 वर्षांच्या प्रदीर्घ शासकीय सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) पदापासून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास सहपरिवहन आयुक्त पदापर्यंत पोहोचला. या 31 वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी केवळ प्रशासकीय खुर्ची उबवली नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात रस्ता सुरक्षा आणि डिजिटल प्रशासनाचा एक नवा ‘नाशिक पॅटर्न’ आणि ‘महाराष्ट्र मॉडेल’ उभा केला. त्यांच्या या 31 वर्षांच्या गतिमान प्रवासाचा घेतलेला हा विशेष आढावा…
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील तांदळी येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबात भरत कळसकर यांचा जन्म झाला. वडील दिनकर कळसकर गावातील प्रगतिशील शेतकरी. दोन भाऊ (भरत व प्रा. सुभाष) आणि एक बहीण अशा कुटुंबात कळसकर यांचे प्राथमिक शिक्षण तांदळीच्या जिल्हा परिषद शाळेत झाले. माध्यमिक शिक्षणानंतर त्यांनी राहुरी कृषी विद्यापीठातून 1990 मध्ये बी.टेक. आणि 1993 मध्ये एम.टेक. ही पदवी संपादन केली. उच्च शिक्षणानंतर त्यांनी 1993 ते 1995 दरम्यान राहुरी येथील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय आणि दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठात सहयोगी प्राध्यापक म्हणून सेवा बजावली. मात्र, प्राध्यापकी पेशात असतानाच स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून त्यांची परिवहन विभागात सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी (एआरटीओ) पदावर निवड झाली आणि सप्टेंबर 1995 मध्ये त्यांनी ‘आरटीओ’चा युनिफॉर्म
परिधान केला.
नाशिकशी अतूट नाते
सन 1995 ते 2001 दरम्यान त्यांनी मुंबई, पुणे, सांगली येथे सेवा बजावली. 2001 मध्ये उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (डेप्युटी आरटीओ) म्हणून पदोन्नती मिळाल्यानंतर त्यांनी नाशिक, पेण (रायगड), वाशी आणि अंधेरी येथे काम केले. 2017 मध्ये त्यांना नाशिक कार्यालयातच प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) म्हणून पदोन्नती मिळाली. नाशिकमध्ये त्यांनी सुमारे नऊ वर्षे सेवा बजावली. या काळात धुळे कार्यालयाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांनी सांभाळला. नाशिकमधील त्यांच्या कार्यकाळात त्यांनी रस्ता सुरक्षेचे अनेक ऐतिहासिक प्रयोग राबवले, ज्यामुळे नाशिक आरटीओ कार्यालयाला संपूर्ण राज्यात एक वेगळी आणि मानाची ओळख मिळाली. यानंतर 2021 मध्ये त्यांची मुंबई (मध्य) आरटीओ आणि परिवहन उपायुक्त (रस्ता सुरक्षा कक्ष) पदावर बदली झाली. आपल्या कामाचा धडाका कायम ठेवल्याने 1 जानेवारी 2026 रोजी त्यांना राज्याचे सहपरिवहन आयुक्त म्हणून
सर्वोच्च बहुमान मिळाला. कळसकर यांच्या नावावर अशा अनेक गोष्टी नोंदवल्या गेल्या आहेत, ज्या महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडल्या. रस्ता सुरक्षेसोबतच त्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वसामान्य नागरिकांचा त्रास कसा कमी होईल, यावर भर दिला.
रिक्षाचालक ते स्कूल बस चालकांचे ‘तारणहार’
कळसकर यांनी स्कूल बस चालकांसाठी अनेक हिताचे निर्णय घेतले. स्कूल बसला अधिकृत मान्यता देण्याचा प्रस्ताव असो वा स्कूल बसचे आयुर्मान 15 वरून 20 वर्षे करण्याचा निर्णय, त्यांनी शासनाकडे सतत पाठपुरावा करून ते मंजूर करून घेतले. रिक्षा, टॅक्सी आणि स्कूल व्हॅन चालकांचे प्रश्न त्यांनी प्राधान्याने मार्गी लावले. त्यांच्या याच कामगिरीची पोचपावती म्हणून शिवसेना (उबाठा) वाहतूक संघटनेतर्फे नाशिकमध्ये त्यांचा नागरी ‘सेवापूर्ती सोहळा’ आयोजित करून गौरव
करण्यात आला.
डिजिटल क्रांतीचे जनक
महाराष्ट्रात पहिल्यांदाच पुणे आरटीओ कार्यालयात संगणकीकृत कामकाजाची सुरुवात करण्याचे श्रेय भरत कळसकर यांना जाते. त्यानंतर सन 2003 मध्ये नाशिकमध्ये देशातील पहिली शिकाऊ परवाना संगणकीय चाचणी त्यांनी सुरू केली.
Road Safety Brand Ambassador: Bharat Kalaskar