♦ अमेरिकेच्या एअरबेसवर इराणचा सर्वांत मोठा हल्ला
♦ रडार सिस्टिम पूर्णपणे उद्ध्वस्त केल्याचा दावा
♦ हॉर्मुझ बंदरातून सागरी वाहतूक ठप्प
वॉशिंग्टन/तेहरान
पश्चिम आशियात आधीच सुरू असलेला तणाव आता एका अत्यंत धोकादायक वळणावर पोहोचला आहे. इराणने अमेरिकेच्या विरोधात थेट युद्ध पुकारत या मोहिमेंतर्गत आखाती देशांमधील अमेरिकन एअरबेसवर भीषण हल्ला केल्याचा दावा केला आहे. स्ट्रॅटेजिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे अमेरिकेचे पेट्रियट एअर डिफेन्स सिस्टिम आणि रडार यंत्रणा पूर्णपणे उद्ध्वस्त केल्याचा दावा इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने सोमवारी केला आहे. या हल्ल्याचा एक कथित व्हिडिओही समोर आला आहे. यामुळे जागतिक राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे.
दुसरीकडे, अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात इराणमधील पाच सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या बंदरांवरील हल्ल्यांचा इराणच्या सागरी व्यापार आणि दळणवळणावर मोठा परिणाम झाला आहे. या हल्ल्यांमुळे इराणी लष्करी तळ आणि पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यांमागे अमेरिका किंवा तिचे मित्रराष्ट्र असल्याचा संशय असून, त्यामुळे संघर्ष आणखी चिघळला
आहे
या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने आक्रमक भूमिका घेतली असून, कुवेत, बहरीन, कतार आणि ओमानसारख्या देशांमधील अमेरिकन लष्करी तळांवर प्रतिहल्ला केला आहे. इराणचा दावा आहे की, त्यांनी या देशांमधील अमेरिकन सुरक्षा यंत्रणा आणि लष्करी मालमत्तेचे मोठे नुकसान केले आहे. इराणच्या या कृतीतून हे सिद्ध झाले आहे की, ते आता बचावात्मक नव्हे, तर आक्रमक युद्धनीतीचा अवलंब करत आहे.
जगभरात चिंतेची लाट
एकाच वेळी अनेक देशांमध्ये झालेल्या हल्ल्यांमुळे जगभरात चिंतेची लाट पसरली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु परिस्थिती अजूनही नियंत्रणाबाहेर असल्याचे दिसते. या संघर्षाचा परिणाम केवळ लष्करी स्तरावरच जाणवणार नाही, तर त्याचा जागतिक कच्च्या तेलाच्या किमती आणि वाहतुकीवरही होईल. ही परिस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या राजनैतिक वाटाघाटींची गरज असल्याचे संयुक्त राष्ट्र आणि इतर शक्तिशाली देशांनी अधोरेखित केले आहे.
इराण-अमेरिका संघर्षात रशियाची उडी
इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावात रशियानेही आता सक्रियपणे सहभाग घेतला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या आदेशानुसार, रशियाने इराणला एक अत्याधुनिक ’टीयू214पीयू’ हवाई कमांड विमान (एअरबोर्न कमांड एअरक्राफ्ट) पाठवून इराण-अमेरिका युद्धाला एक मोठे वळण दिले आहे. इराणला हे विमान देऊन रशियाने हे सूचित केले आहे की, या युद्धात इराणला एकटे सोडण्याची त्यांची इच्छा नाही. युक्रेन युद्धानंतर अमेरिका आणि रशिया यांच्यातील संबंध आधीच तणावपूर्ण आहेत. आता इराण-अमेरिका युद्धात रशियाचा थेट सहभाग हे आंतरराष्ट्रीय संबंधांपुढील एक नवीन आव्हान आहे.
अमेरिकेत सप्टेंबरमध्ये ‘शटडाउन’ : ट्रम्प
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी येत्या सप्टेंबर महिन्यात अमेरिकेत सरकारी कामकाज ठप्प होण्याची स्थिती असून,
’गव्हर्न्मेंट शटडाउन’ लागू होण्याची मोठी शक्यता वर्तवली आहे. यासंदर्भात अत्यंत गंभीर इशारा दिला आहे. अमेरिकन संसदेत सरकारी खर्चाच्या आणि अर्थसंकल्पीय निधीच्या प्रस्तावाला वेळेत मंजुरी न मिळाल्यास अनेक फेडरल सरकारी संस्थांचे कामकाज आर्थिक अभावी थांबवावे लागते, ज्याला अमेरिकन व्यवस्थेत ’शटडाउन’ म्हटले जाते. प्रशासकीय खर्चावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमत न झाल्यास सप्टेंबरमध्ये ही अभूतपूर्व परिस्थिती ओढावू शकते, या ट्रम्प यांच्या इशार्यामुळे अमेरिकेच्या राजकीय आणि आर्थिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या देशांतर्गत आर्थिक संकटाच्या इशार्यासोबतच, डोनाल्ड ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय धोरणांवरही स्पष्ट भाष्य केले आहे. त्यांनी इराणच्या मुद्द्यावर कडक भूमिका घेत म्हटले आहे की, इराणसोबत झालेल्या ताज्या चर्चेतून कोणतीही ठोस निष्पत्ती निघालेली नाही आणि इराणला यातून काहीही साध्य झालेले नाही. एका बाजूला देशांतर्गत निधीच्या मुद्द्यावरून सप्टेंबरमध्ये संभाव्य ’शटडाऊन’ची दिलेली धमकी आणि दुसर्या बाजूला इराणसारख्या देशांसोबतच्या चर्चेबाबतचे आक्रमक धोरण, यावरून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे आगामी काळात आपले प्रशासकीय आणि परराष्ट्र धोरण अत्यंत कठोरपणे राबवणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
US-Iran conflict escalates further.