आमच्या बालपणाचे सोबती!

– अमोल जगताप
गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर शेजारून वाहणारा पाट, पाटाच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, घराजवळून विहिरीकडे जाणारी पायवाट आणि अंगणात कायम ऐकू येणारा गुरांच्या गळ्यातल्या घंटांचा मंद आवाज या सगळ्या वातावरणात आमचं बालपण वाढत होतं. त्या बालपणात अनेक सवंगडी होते, भावंडं होती, झाडं होती, विहीर होती, काजवे होते पण त्यातले सर्वात शांत, विश्वासू आणि प्रेमळ सोबती होते ते म्हणजे आमचे दोन बैल- हौश्या आणि नग्या.
आजच्या मुलांना बैल म्हणजे फक्त पोळ्याच्या दिवशी रंगवलेला प्राणी वाटतो. आमच्यासाठी मात्र बैल हे घरातल्या माणसांइतकेच जवळचे होते. त्यांच्या डोळ्यांतला निरागसपणा, त्यांच्या चालण्यातला रुबाब आणि त्यांच्या अंगावरून हात फिरवला की जाणवणारा विश्वास, हे सगळं आजही तसंच मनात
जिवंत आहे.
हौश्या आणि नग्या दोघेही मोठ्या शिंगांचे, भरदार शरीराचे होते. सकाळी गोठ्यात उभे असले की त्यांचं व्यक्तित्त्वच वेगळं वाटायचं. पण त्यांचा स्वभाव मात्र शांत. आम्ही लहान मुलं त्यांच्या पायाजवळ खेळत असायचो, त्यांच्या पाठीवर हात फिरवायचो, कधी शेपटी पकडून उभं राहायचो, तरी त्यांनी कधी राग दाखवला नाही. पहाटे सूर्य उगवलेला नसताना अन् मळ्यातल्या वावराच्या पिकांवर दवबिंदू चमकत असतांना, जेव्हा आई चुलीवर चहा ठेवायची आणि तात्या गोठ्याकडे निघायचे. तेव्हा गोठ्यात शिरताच हौश्या आणि नग्या तात्यांचा आवाज ओळखायचे. त्यांच्या गळ्यातल्या घंटा हलक्या आवाजात वाजायच्या आणि ते मान हलवून जणू गोठ्यात स्वागत करायचे. मन तात्या त्यांना बाहेर खुट्याला बांधायचे आणि पहाटे कापून आणलेला घास, गवत तर कधी कधी चंदी टाकायचे.
बैलांना गाडीला जुंपण्याची प्रक्रिया आम्ही पाहत बसायचो. बैलगाडीचे फक्त जू तात्यांनी वरती केले की हे दोघेही स्वतःहून जू खालून आपली मान टाकून स्वतःला जुंपून घ्यायचे. मग जू त्यांच्या मानेवर अलगद ठेवून तात्या शिवळा-जोते बांधायचे. तात्यांना या गोष्टींचा खूप सराव होतो. बैलही अगदी शांत उभे राहून त्यांना जणू मदतच करायचे. माणूस आणि प्राणी यांच्यातलं हे निःशब्द नातं तेव्हा आम्हाला कळत नव्हतं, पण आज त्याचा अर्थ समजतो.
बैल शेताकडे निघाले की आमचा खेळ सुरू व्हायचा. आम्ही भावंडं त्यांच्या मागे धावत सुटायचो. सुरुवातीला तात्या ओरडायचे, अरे मागे राहा, लाथ बसेल! पण ती भीती दोन मिनिटांपेक्षा जास्त टिकायची नाही. कधी त्यांच्या पावलांच्या ठशात पाय ठेवत चालायचो, तर कधी धावत जाऊन त्यांच्या मानेवर थोपटून पुन्हा
मागे यायचो.
त्यांच्या गळ्यातल्या घंटांचा आवाज अजूनही कानात घुमतो. त्या घंटांना एक ठराविक लय होती. दोन बैल एकत्र चालले की त्या आवाजात जणू एखादं संगीतच तयार व्हायचं. सकाळच्या शांत वातावरणात तो नाद फार दूरपर्यंत ऐकू यायचा. एखाद्या मंदिराच्या आरतीत होणार्‍या घटानादे सारखा तो आम्हाला पवित्र वाटायचा. शेतात पोहोचल्यावर तात्या नांगर हातात घ्यायचे आणि हौश्या-नग्या आपल्या संथ पण ताकदवान पावलांनी जमीन फोडायला सुरुवात करायचे. आम्ही शेताच्या बांधावर बसून ते पाहत राहायचो. नांगराच्या मागे उलटलेली काळीभोर माती पाहताना एक वेगळीच मजा वाटायची. त्या मातीतून येणारा सुगंध आजही कोणत्याही परफ्यूमपेक्षा जास्त मोहक वाटतो. कधी तात्या थोडा वेळ विश्रांती घेत असताना आम्ही बैलांच्या जवळ जायचो. त्यांच्या पाठीवर थाप मारायचो. त्यांच्या कपाळावर हात फिरवायचो. ते मोठ्या शांत डोळ्यांनी आमच्याकडे बघायचे. त्या नजरेत इतका विश्वास असायचा की भीतीचा प्रश्नच नव्हता. उन्हं चढली की बैलांनाही विश्रांती मिळायची. त्यांच्या पुढे पुन्हा चारा टाकला जायचा. ते शांतपणे खात राहायचे. आम्ही मात्र त्यांच्या शिंगांना हात लावून त्यांची उंची मोजायचो. कधी त्यांच्या सावलीत बसून खेळायचो. नांगरून झाले की त्यांच्या सोबतच घरी यायचो.
पोळ्याचा दिवस आला की हौश्या आणि नग्या अगदी नवर्‍या मुलासारखे सजायचे. त्यांना अंघोळ घातली जायची. शिंगांना रंग लावला जायचा. लाल रंग आणि त्यावर पिवळे टिपके किंवा निळा रंग त्यावर लाल ठिपके हे तात्यांचे आवडते रंग असायचे. गळ्यात नवीन घंटा, रंगीबेरंगी हार, कपाळावर कुंकू त्या दिवशी त्यांच्यात एक वेगळाच रुबाब असायचा. आजी, आई, काकू, बिच्ची बैलांना ओवळायचे, पुरणाचा घास त्यांना खायला द्यायचे. त्यांच्या पायाला हात लावून तात्या नमस्कार करायचे. ते दृश्य तेव्हा फक्त एक प्रथा म्हणून बघायला भारी वाटायची. पण आज समजतं, तो नमस्कार त्यांच्या कष्टाला होता, शेतीला होता आणि आपल्या पोटासाठी आयुष्यभर राबणार्‍या त्या मुक्या जीवाला होता.
हळूहळू काळ बदलला. शेतात ट्रॅक्टर आले. बैलगाड्या कमी झाल्या. गोठ्यांतली गुरं कमी होत गेली. हौश्या-नग्यासारखे साथीदारही फक्त आठवणीत राहिले. आज ट्रॅक्टर एका तासात जे काम करतो, ते काम करायला कदाचित दोन बैलांना दिवसभर लागायचा. पण ट्रॅक्टरच्या इंजिनात गळ्यातल्या घंटांचा नाद नाही. त्याच्या धुरात ओल्या मातीचा सुगंध नाही आणि त्याच्या लोखंडी शरीरात त्या मुक्या डोळ्यांतला आपलेपणाही अजिबात दिसत नाही. आज कधी गावाकडे गेलो आणि एखादा बैल दिसला की नकळत हात त्याच्या पाठीवर फिरवावासा वाटतो. मन पुन्हा त्या दिवसांत जातं जिथे आम्ही बैलांच्या मागे धावत होतो पायात चप्पल नव्हती डोक्यात कसली काळजी नव्हती आणि आयुष्याच्या शर्यतीत पुढे जाण्याची घाईही नव्हती.
आम्ही फक्त धावत होतो हौश्या आणि नग्याच्या मागे आणि खरं तर, त्या धावण्यातच आमचं संपूर्ण बालपण सामावलेलं होतं. आज त्या पायवाटा तशाच आहेत शेतंही तशीच आहेत पण बैलांच्या गळ्यातल्या घंटांचा तो नाद आता फार क्वचित ऐकू येतो. कदाचित म्हणूनच.. बालपणाची आठवण आली की सर्वात आधी डोळ्यांसमोर उभे राहतात ते दोन शांत चेहरे मोठी शिंगं.. विश्वासाने भरलेले डोळे आणि त्यांच्या मागे धावत जाणारी आमची निष्पाप पावलं.. बस्स…

Companions of our childhood!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *