मिसिंग कल्चर

– राजेश शिरभाते
मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या मिसिंग लिंक या रस्त्याच्या निकृष्ट कामाबद्दल विरोधकांनी केलेल्या टीकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच विधिमंडळात चांगलेच खडसावले. बरं, महाराष्ट्राच्या विधिमंडळात मुख्यमंत्र्यांनी चक्क हिंदीतून भाषण केल्यामुळे एका प्रकारे हिंदीला विरोध करणार्‍यांनाही चांगलेच झापले. एखाद्या सरकारी कामामध्ये काही भ्रष्टाचार झाला त्यातून त्या कामात काही त्रुटी निघाल्या, तर त्यावर बोलणार्‍यांना हा चांगलाच इशारा होता. सरकार हे आपले मायबाप असते. त्यांनी जसे ठेवले तसे गपगुमान पडून राहायचे असते. आपल्या नेत्याची नेहमी हांजी हांजी, त्यांचे स्तुतिपाठक व्हायचे असते. हे सोडून जे सरकारच्या कामावर टीका करतात त्यांची फडणवीसांनी चांगलीच खरडपट्टी काढली. त्यामुळे काँग्रेसच्या काळात सरकारवर टीका करण्याची घाणेरडी सवय लागलेल्या व स्वतःला लोकशाही देशात राहत असल्याचा आव आणणार्‍या विरोधकांना त्यांची जागा कळली आहे. वास्तविक फडणवीसांच्या भाषेत आमच्यासारख्या कुत्रंही न विचारणार्‍यांनी यावर काही बोलायला नको मात्र, काय करणार पत्रकारितेचा जुना अनुभव पाहता काही लिहावे लागेलच.

मिसिंग लिंकवर मोठी दरड कोसळली. त्यामुळे जरी आर्थिक नुकसान झाले असले, तरी त्यातून काही दुर्घटना घडली नाही, हे आपले सुदैव. एखाद्या सरकारी कामामध्ये काही चूक निघाली तर त्यावर बोलणे हा एकेकाळी विरोधकांचा आणि जनतेचा हक्क होता. कोरोना काळात तर मंदिरे उघडवातीत यासारख्या गोष्टींसाठीही तत्कालिन विरोधकांनी आंदोलन केले होते. आता राममंदिरात एवढी मोठी चोरी झाली आहे. तेव्हा हे सारे जण मूग गिळून आहेत. (मूग गिळून बसणे हा मराठीतील एक वाक्प्रचार म्हणून वापरला आहे. निश्चितपणे काय गिळल्यामुळे गप्प बसले असतील, याची कोणतीही ठोस माहिती सध्यातरी उपलब्ध नाही. असो.). प्रत्येक प्रकल्प हा जनतेच्या कराच्या पैशांमधून पूर्णत्वास येत असतो. विश्वस्त संस्था आणि लोकशाही देशांमध्ये या करदात्याला मोठे महत्त्व असते. त्यांना आपल्या पैशांबद्दल विचारण्याचा हक्क असतो. सत्ताधारीही आपण लोकांसाठी, जनतेसाठी काम करत आहोत, हे दाखवत असतात. एखाद्या कामात जर कोणी कसूर केली तर त्याला जाब विचारण्याचा, त्याच्यावर कारवाई करण्याचा अधिकार लोकांनी स्वतःहून या सत्ताधार्‍यांना दिलेला असतो. जेव्हा सत्ताधारी कसूर करणार्‍यावर कारवाई न करता प्रश्न विचारणार्‍यांना धारेवर धरतात, तेव्हा ते नक्की कोणाचे प्रतिनिधी आहेत, याचा एक अंदाज येतो. तुम्ही जर हा प्रकल्प केला असेल तर त्याची थोडीफार नैतिक जबाबदारी घ्यायला काही हरकत नाही एवढीच भाबडी आणि रास्त अपेक्षा जनता ठेवत असते.
फडणवीसांनी त्यांच्या भाषणात भाडे के टट्टू असा उल्लेख केला. म्हणजे जे पैसे घेऊन सरकारवर टीका करतात! या भाड्याने काम करणार्‍यांचे एक वैशिष्ट्य असते ते म्हणजे, जिथून जास्त भाडे मिळेल तिथले काम करणे. आपण साधी रिक्षा जरी करायची म्हटली तरी कमी अंतरासाठी कोणी येणार नाही. जो अधिक अंतरासाठी म्हणजे जास्त पैसे मोजणार आहे, त्यांच्याकडेच ते जाणार. त्यात त्यांचा काही दोष नसतो. प्रत्येकाला आपले पोट भरण्याचा अधिकार आहे. सर्वसामान्य जनताही ते गृहित धरत असते. आता भाविक देवालाही अर्पण करतात तेव्हा त्याचा उपभोग देव घेणार नाही, हे त्यांना माहीत असते. मात्र, देवाच्या निमित्ताने समाजातल्या काही घटकांना काही मिळत असेल तर त्याला या भाविकांची ना नसते. त्यामुळे मिसिंग लिंकबद्दल कोणी भाड्याने लिहिले असेल असे वाटत नाही. सध्याच्या महाराष्ट्रातील विरोधी पक्षांची आर्थिक स्थिती पाहता ते कोणाला इतके पैसे देऊन केवळ मिसिंग लिंक या एकाच विषयावर लिहायला लावतील असे वरकरणी तर दिसून येत नाही. मग प्रश्न निर्माण होतो की, मिसिंग लिंकवर इतक्या प्रतिक्रिया का आल्या? त्याचे सर्वांत मुख्य कारण म्हणजे, पुणे- मुंबई हा जो महामार्ग आहे तो पुढे देशाच्या दक्षिणेला जोडणारा एक महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गाने केवळ पुणेच नाही, तर पुढे अगदी कन्याकुमारीपर्यंतही जाता येते. त्यामुळे हा मार्ग वापरणार्‍यांची संख्या अधिक आहे. बरं हे सारेच मराठी नाहीत, तर इतर राज्यांचेही आहेत. त्यातही जे दक्षिणेतल्या राज्यामधले आहेत त्यांना त्यांच्या राज्यात चांगले रस्ते मिळत असल्याने त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या असतात. त्याचप्रमाणे इथेही काम व्हावे, असे त्यांना वाटत असते. मात्र, महाराष्ट्र हा फडणवीसांच्या नेतृत्वाखाली देशातील सर्वांत प्रगत राज्य आहे. अगदी तामिळनाडू, केरळ, तेलंगणा यांसारखी राज्ये आपल्यासमोर काहीच नाहीत. तरीही या लोकांनी मिसिंग लिंकवर टीका करावी, हे चुकीचे आहे. म्हणजे तुम्ही तिकडे समाजमाध्यमावर त्या विजयचे कौतुक करायचे. त्याच्या एकेका निर्णयावर पोस्ट लिहायच्या आणि आमच्यावर टीका करायची, हे काही बरोबर नाही. तो विजय तिकडच्या लोकांचा लाडका असला म्हणून काय झाले? आमचे सरकारही लाडक्या बहिणींनी आणलेले आहे, हे लोक विसरतात.
दुसरा फडणवीसांचा बिनतोड मुद्दा म्हणजे, ज्यांना कुत्रंही विचारत नाही. आता मी काय म्हणतो, प्रत्येकाला कुत्र्यांनी विचारायला हवे का? नसेल त्याचा मूड तर काही करायचे. आता अनेक नेत्यांनाही कोणी विचारत नाही. ते गर्दी जमवण्यासाठी पैसे देतात तेव्हा कुठे लोक त्यांची भाषणे ऐकायला जातात. त्यांच्या चेहर्‍यावरही हा नेता कोणत्या मुद्द्यावर बोलला हे दिसून येत नाही. बरं नसेल टीकाकारांना कुत्रं विचारत. मात्र, लोकशाहीच्या तत्त्वात तर सगळे समान आहेत. कोणी उच्च-नीच नाही. सर्वच जण समान आहेत. कोणी श्रेष्ठ नाही, कोणी कनिष्ट नाही. हे चुकीचे विचार घेऊन लोक अजूनही राहतात. याचा कदाचित फडणवीसांना राग आला असावा. आता शनिवार वाड्यावरच्या पंगतीला काय कोणालाही बोलवायचे? त्याला काही खास लोकांनाच बोलावले पाहिजे. त्यानुसार सर्वसामान्यांनी या सरकारबद्दल काही बोलू नये, हे त्यांनी खडसावले आहे, हे बरे झाले आहे. लोकांना एकदातरी त्यांची खरी स्थिती दाखवायला हवी होती. तुम्ही म्हणजे सरकार नाही. हे राज्य फडणवीसांचे आहे. लोकांनी त्यांच्या कामात लुडबूड करू नये. पडला एखादा खड्डा, गेली काही माणसे. नाही मिळाला शेतकर्‍यांना भाव, लोकांना झाला थोडासा त्रास. त्याचा एवढा गहजब कशाला करायचा? फडणवीसांनी जे विधिमंडळात सांगितले तशाच प्रकारचा संदेश त्यांच्या मित्रपक्षाच्या एका नगरसेवकाने डोंबिवलीत दिला. त्याने चक्क महिला डॉक्टरला शिवीगाळ केली. मारहाण केली. त्यानंतरही काहीच झाले नाही अशी पत्रकार परिषद घेऊन आपणच बरोबर आहोत असे दाखवले. डॉक्टरांनी त्याला जे उत्तर दिले ते त्याला आवडले नाही. जो नगरसेवक आपल्या वॉर्डात दहा वर्षात रुग्णालयात चांगल्या सुविधा पुरवू शकत नाही त्याने डॉक्टरांना केलेल्या मारहाणीनंतर समाजमाध्यमांवर मोठी टीका झाली. सर्वच जण डॉक्टरांच्या बाजूने ऊभे राहिले. त्यानंतर त्याला नाईलाजाने अटक करावी लागली. त्या बरोबर तो तातडीने रुग्णालयात गेला. तिथे त्याच डॉक्टर पेशाचे लोक त्याच्यावर उपचार करत आहेत. डॉक्टरांच्या त्या न्याय वृत्तीला सलाम केला पाहिजे. जसे याला डॉक्टला कानफटात मारावी असे वाटले तशा प्रकारे याला एखादे इंजेक्शन देऊन त्याचा कायमचा इलाज करावा अशी भावना डॉक्टरांच्या मनात आली नाही. हा देश आजही अशाच प्रकारच्या काही विचारांवर चालणारा आहे. भले कुत्रं विचारू वा न विचारु दे. लोकांनी आपली कामे केलेली आहेत. या समाजाला दिशा दिलेली आहे. विनम्रतेचा अंगिकार केला आहे. लोकांविषयी मनात प्रेम बाळगले आहे. आपल्यावर टीका केलेल्यांना समजून घेऊन त्यांच्याशी चर्चा करुन त्यातून मार्ग काढण्याची महाराष्ट्राची संस्कृती आहे. ती एका माणसाच्या भाषणाने संपणारी नाही. हे समाधान आहे. आताचा तरुण हे सारे नव्याने पाहात आहे. त्याला कदाचित असे वाटेल की राजकारण सुरुवातीपासून याच पातळीवर होते. तसे नाही या महाराष्ट्राने लोकांची टीका सकारात्मकरित्या घेतलेली पाहिली आहे. त्यांना सन्मान दिलेला पाहिला आहे. दोन भिन्न पक्षातील नेत्यांमधील मैत्री पाहिलेली आहे. तरुणांनी हे समजून घेतले पाहिजे की हे अशा प्रकारचे औट घटकेची अनेक सरकारे आली व गेली. या देशाचा इतिहास हे दाखवून देतो की प्रत्येक राजवटीचा अंत हा त्यांच्यातील अंहकाराने केलेला आहे. या लेखाचा शेवट करताना एक गोष्ट आठवते. एकदा पंडित जवाहरलाल नेहरू सामान्य माणसांशी बोलत होते. एक उद्विग्न महिला त्यांच्या बरोबर भांडायला लागली. तिने थेट नेहरुंच्या कॉलरला हात घातला व म्हणाली काय मिळाले मला तुमच्या या स्वातंत्र्याने. नेहरुंनी शांतपणे तिला उत्तर दिले की या स्वातंत्र्याने तुला या देशाच्या पंतप्रधानाची कॉलर पकडण्याचा अधिकार दिला. तुझे म्हणणे मला ऐकावेच लागणार आहे. त्यावर काम करावे लागणार आहे. हे सारे या देशाच्या स्वातंत्र्याने आणि लोकशाहीने दिलेले आहे. नेहरूंचे ते विचार होते कारण नेहरूंनी स्वातंत्र्यलढ्यातही भाग घेतला होता.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *