पिंपळगाव टोलनाक्यावर 535 किलो गांजा जप्त

ग्रामीण पोलिसांची कारवाई; तब्बल एक कोटी 12 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

दिक्षी, निफाड : तालुका प्रतिनिधी
नाशिक ग्रामीण पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधातील मोहिमेला मोठे यश मिळवत पिंपळगाव बसवंत टोलनाका परिसरात छापा टाकून 535 किलो गांजा जप्त केला. या कारवाईत एका संशयिताला अटक केली आहे. एक कोटी 12 लाख 14 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पिंपळगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांना 14 जुलै 2026 रोजी गुप्त माहिती मिळाली की, नाशिककडून मालेगावच्या दिशेने जाणार्‍या पिकअप (एमएच06 बीजी 1776) वाहनातून गांजाची तस्करी केली जात आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पिंपळगाव टोलनाक्यावर सापळा रचून वाहनाची तपासणी केली. तपासणीदरम्यान वाहनातून 535 किलो गांजा आढळून आला. या प्रकरणी राहुल शांताराम पाटील (वय 33, रा. मुकटी, ता.जि.धुळे) याला ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताला अटक केली असून त्याच्याकडून 535 किलो गांजा, पिकअप वाहन, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 1,12,14,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक (मालेगाव) व अपर पोलीस अधीक्षक (नाशिक ग्रामीण) यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध व्यवसाय व अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमंंतर्गत ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिस निरीक्षक गणेश गुरव, स.पो.नि.रोहिदास भोर, सहा पोलिस उपनिरीक्षक चारोसकर, अंमलदार प्रशांत उगले, हवालदार शिंदे व निकम, शिपाई विकास वाळुंज यांनी मोलाची भूमिका बजावली.

तस्करांचेे रॅकेट उघड होण्याची शक्यता

पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी नुकताच पिंपळगाव पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे. त्यानंतर निरीक्षक गुरव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुप्त माहितीच्या आधारे नियोजनबद्ध पद्धतीने पिंपळगाव टोलनाक्यावर सापळा रचत ही धडक कारवाई केली. कारवाईत कोटींचा मुद्देमाल हस्तगत केला. निफाड तालुक्यातील अंमली पदार्थांविरोधातील ही अलीकडच्या काळातील सर्वात मोठ्या कारवायांपैकी एक मानली जात असून, या कारवाईमुळे तस्करांचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

535 kg of cannabis seized at Pimpalgaon toll plaza.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *