इडली हा शब्द मुळात कुठून आला काय माहीत? पण ’इटली’. नंतर काय फेमस असेल तर ती इडलीच…इडली मूळ दक्षिण भारतातील. हा एक मुख्य लोकप्रिय पदार्थ. पौष्टिक व पचायला हलका असा. तितकाच चांदोबासारखा गोल, पांढराशुभ्र व मऊ. जितका मुंबईचा वडापाव, महाराष्ट्रातली पुरणपोळी, नाशकातील मिसळ. पुण्याची बाकरवडी.. तितकीच लोकप्रिय. नाश्त्याला खायला कोणता पदार्थ योग्य तर दर आठवड्यात कधी ना कधी बनणारा! तांदूळ, उडदाची डाळ भिजवून दळून खायला केलेला सोपा पदार्थ, ना तळणं, ना भाजणं, ना मळणं, खायला व करायलाही फारसा त्रास न होणारी ही इडली! तिचा उगम खरंतर इंडोनेशियात झालाय, पण केरळ, तामिळनाडूतही इडली… छान मऊ, पांढरे शुभ्र, नाजूक आणि हलकीशी.. खाताना आपण किती खातो याचं भान होऊ न देणारी… काही बेभान करणारी.. प्रत्येक ठिकाणच्या इडल्या किती वेगवेगळे आणि विभिन्न.. मस्त केळीच्या हिरव्यागार पानावर पांढरीशुभ्र इडली, हिरवी चटणी आणि तांबूस सांबारसोबत विराजमान होते. आणि खाणार्याचा आत्मा तृप्त होतो.. इडलीवर सार्यांचं प्रेम, डायबिटीस, बीपी कुठल्याही आजाराशी तिचं जमतं. आपल्या मूळप्रमाणे इडली खुलत जाते, इडलीचे पीठ आंबवून यापासून ती पात्रातून बाहेर काढण्यापर्यंत तिची प्रोसेस असते.
मस्त कोथिंबीर आणि मिरची, खोबरे, जिरे घालून तयार केलेली झणझणित फोडणीची चटणी तिची लज्जत वाढवते. तसंच खोबरं, टोमॅटो, भोपळा, शेंगा घालून केलेलं सांबारही त्या खाण्यातला आनंद अधिक वाढवतो. हल्ली साध्या टपरीपासून ते उडपी हॉटेल या पंचतारांकित हॉटेलमध्ये प्रसिद्ध असलेला पदार्थ… पार घराघरापासून कार्यालयातसुद्धा पोहोचला. सकाळी आठलाही ताजा असलेला आणि बारमाही असलेला….
एखाद्या उडप्याच्या हॉटेलमध्ये आठ वाजता असलेला अगरबत्तीचा सुगंध आणि इडलीचा सुवास सगळीकडे दरवळतो. आणि मग खाणार्यांची मैफल रंगते! इडली वडा, इडली सांबार, ग्रीन इडली, हल्ली मिक्स इडली, रवा इडली, पोडी इडली, थट्टेे इडली, मसाला इडली इतके सारे प्रकार आहेत. कशातही ती मिक्स होते. मग तिच्याबरोभर तिथं मोठं भावंडे आहेत…. डोसा, उत्तप्पा, वडा, आप्पे सारे सजून येतात.. पण तरी त्यातील इडली भाव खाऊन जाते. तिला काळ-वेळेचं बंधन नाही. सकाळ, दुपार, सायंकाळ केव्हाही खा ताजीच. दीर्घकाळात तोंडावर चव ठेवणारी आणि ताजीतवानी खाल्ल्याचं समाधान देणारी…. हल्ली ट्रॅव्हलिंगमध्ये चार इडल्यांचे पाकीट व मसाला इडली वेळ निभावून नेते. तामिळनाडूतून आलेला हा दाक्षिणात्य पदार्थ कधी आपला झाला आणि आपण त्याचे कधी झालो हे कळलंही नाही! लहानांपासून वृद्धांपर्यंतचा लाडका. माझ्या खूप आठवणी या रविवारच्या इडलीशी निगडित आहेत!
वरणगावला लहानपणी एक मद्रासी आँटी पाट्यावर इडलीचे पीठ वाटून विकायच्या. आम्ही बरोबर नऊ वाजता इडली घेण्यास जायचो आणि तो डबा दिवसभर पुरवायचो… त्यासोबत आईने केलेली हिरवीगार तिखट चटणी आणि तिच्या हातचा आंबट-गोड सार! आहा समोर टीव्हीवर रामायण.. हे सगळे इडलीने गाजवले. मध्यंतरी केरळ, मुन्नारला भटकंतीत याच इडली-रस्स्मवर ताव मारला. माझ्या बाबांची आवडती मैत्रीण ही इडली यावर त्यांच्यासाठी लिहिलेला हा लेखनप्रपंच… इडली एक मैत्रीण….
The Idli Saga