एसटी प्रवासासाठी एक सप्टेंबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक

महिला, ज्येष्ठ, अमृत ज्येष्ठ नागरिकांनी तातडीने नोंदणी करणे आवश्यक

निफाड : विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून,आता नव्या नियमानुसार एक सप्टेंबरपासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी एनसीएमसी (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे.
राज्य शासनाच्या विविध सवलत योजनांचा लाभ घेणार्‍या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांना तिकीट वितरण प्रक्रियेत सुलभता आणि अचूकता यावी, तसेच एसटीच्या डिजिटल व्यवस्थापनाला चालना मिळावी, या उद्देशाने एनसीएमसी स्मार्ट कार्ड प्रणाली लागू करण्यात येत आहे. या स्मार्ट कार्डच्या माध्यमातून प्रवाशांची माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध राहणार असून, सवलतींची अंमलबजावणी अधिक पारदर्शक पद्धतीने होणार आहे. या नव्या व्यवस्थेच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील विविध एसटी आगारांमध्ये आणि नियुक्त केंद्रांवर स्मार्ट कार्ड
नोंदणी व वितरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न सुरू असून, कार्ड वितरण प्रक्रिया अधिक सुलभ आणि गतिमान करण्यात आली आहे. दररोज मोठ्या संख्येने लाभार्थी नोंदणी करून स्मार्ट कार्ड स्वीकारत आहेत.
एसटी प्रशासनाने संबंधित लाभार्थ्यांना आता 1 सप्टेंबरपूर्वी स्मार्ट कार्ड प्राप्त करून ते कार्यान्वित करून घ्यावे, असे आवाहन केले आहे.
वेळेत स्मार्ट कार्ड न घेतल्यास प्रवासादरम्यान सवलतींचा लाभ घेण्यात अडचणी येण्याची शक्यता असल्याने लाभार्थ्यांनी शेवटच्या क्षणाची वाट न पाहता तातडीने नोंदणी करून कार्ड मिळवावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्रशासनाने सर्व पात्र प्रवाशांनी या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देऊन वेळेत स्मार्ट कार्ड प्राप्त करण्याचे आवाहन केले आहे.

महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांनी वेळेत स्मार्ट कार्डची नोंदणी करून ते प्राप्त करून घ्यावे.असे आवाहन या पूर्वी एसटी प्रशासनाने केले आहे. त्यासाठी नाशिक जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्व आगारांमध्ये यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, स्मार्ट कार्डमुळे सवलतींचा लाभ अधिक पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने मिळणार आहे.
– मनोज गोसावी, आगार व्यवस्थापक

Smart card mandatory for ST travel from September 1st.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *