सायंकाळच्या लोडशेडिंगमुळे शेतकर्‍यांचे हाल थांबवा; लोडशेडिंगवर खा. वाजे आक्रमक

नाशिक : प्रतिनिधी
नाशिकच्या ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून सायंकाळच्या वेळेत होत असलेल्या वीज खंडितमुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या गंभीर प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर खासदार राजाभाऊ वाजे यांनी शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळासह महावितरणचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे, अधीक्षक अभियंता अनिल थोरात आणि कार्यकारी अभियंता अनिल झटकरे यांची भेट घेऊन चर्चा केली.
यावेळी खा. वाजे यांनी सायंकाळच्या वेळेत होणार्‍या लोडशेडिंगमुळे शेती, दुग्धव्यवसाय, पिण्याचा पाणीपुरवठा तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होत असलेल्या परिणामाकडे अधिकार्‍यांचे लक्ष वेधले. विशेषतः रात्रीच्या वेळी शेतीपंपांसाठी वीजपुरवठा होत असल्याने शेतकर्‍यांना अंधारात शेतात जावे लागते. त्यामुळे बिबट्या व इतर वन्यप्राण्यांच्या हल्ल्याचा धोका वाढत असून, शेतकर्‍यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच अनेक गावांमध्ये नवीन फीडर उभारणी, कृषी फीडर विभक्तीकरण, क्षमतेत वाढ, डीपी व इतर विद्युत पायाभूत सुविधांची कामे मंजूर असूनही ती संथगतीने सुरू असल्याची बाबही त्यांनी निदर्शनास आणून दिली. ही सर्व प्रलंबित व रेंगाळलेली कामे निश्चित कालमर्यादेत पूर्ण करून ग्रामीण भागातील वीजपुरवठा अधिक विश्वासार्ह करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या.शेतकर्‍यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन प्रत्येक प्रकरणाचा आढावा घेण्याचे तसेच आवश्यक तेथे तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देशही खासदार वाजे यांनी दिले. विशेषतः सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत होणारे लोडशेडिंग कमी करण्यासाठी आणि नागरिकांना पूर्वकल्पना देऊनच वीजपुरवठा खंडित करण्यासाठी योग्य नियोजन करण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी महावितरणच्या अधिकार्‍यांनी उपस्थित करण्यात आलेल्या सर्व मुद्द्यांची नोंद घेऊन प्रलंबित फीडरची कामे गतीने पूर्ण करण्यासाठी आणि ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुधारण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.

शेतकर्‍याला सुरक्षित, अखंड आणि दर्जेदार वीजपुरवठा मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. शेतकर्‍यांच्या सुरक्षिततेशी आणि शेतीच्या उत्पादनाशी संबंधित प्रश्नांमध्ये कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही. महावितरणने तातडीने ठोस उपाययोजना करून ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत करावा.
– राजाभाऊ वाजे, खासदार, नाशिक

Put an end to the farmers’ plight caused by evening load-shedding; MP Waje takes a strong stand on the issue.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *