कोकणातील ‘पुरी’ संप्रदायाच्या इतिहासावर नवा प्रकाश
अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील अलिबाग नजीक असलेल्या कुसुंबळे गावात एका प्राचीन शिवमंदिरात शके 1820 (इ.स. 1898) मधील एक महत्त्वपूर्ण ब्रिटिशकालीन शिलालेख आढळून आला आहे. कोकण इतिहास परिषदेचे रायगड जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. अंजय धनावडे यांनी शिवमंदिराच्या जोत्यावर कोरलेल्या या चार ओळींच्या दुर्मिळ शिलालेखाचा शोध लावून त्याचे यशस्वी वाचन केले आहे. अलिबाग हे ब्रिटिश राजवटीत प्रशासकीय केंद्र असतानाही, ग्रामीण भागात स्थानिक मंदिर व्यवस्थापन आणि मठपरंपरा किती प्रभावीपणे कार्यरत होत्या, याचा हा एक भक्कम अभिलेखीय पुरावा मानला जात आहे.
या शिलालेखात ‘विलंबी नाम संवत्सरे’ असा स्पष्ट कालवाचक उल्लेख असून, मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याची नोंद आहे. विशेष बाब म्हणजे, या दस्तऐवजामध्ये बुधपुरी, समशेरपुरी, शंकरपुरी, चिदापुरी, नातू देऊपुरी आणि गुरू मंगळपुरी अशा अनेक साधूंची नावे सलग कोरलेली आहेत. प्रा. डॉ. धनावडे यांनी स्पष्ट केल्यानुसार, ही सर्व नावे दशनामी गोसावी परंपरेतील ‘पुरी’ शाखेशी जोडलेली आहेत. एकाच ऐतिहासिक नोंदीत इतक्या ‘पुरी’ साधूंचा एकत्रित उल्लेख सापडणे ही अत्यंत दुर्मिळ घटना असून, यातून कोकणातील शैव परंपरा आणि मंदिरांच्या देखभालीत या संप्रदायाचे असलेले मोठे योगदान अधोरेखित होते. कोकणातील या पुरी परंपरेचे धागे थेट शिवकाळापर्यंत पोहोचतात, जिथे इतिहासात ‘निश्चलपुरी’ यांचा संदर्भ येतो. नव्याने सापडलेल्या या शिलालेखातील पुरी साधू आणि शिवकालीन निश्चलपुरी यांच्यात थेट संबंध असल्याचा अद्याप कोणताही पुरावा नसला, तरी पुढील ऐतिहासिक संशोधनासाठी हा एक महत्त्वाचा दुवा ठरू शकतो. प्रत्यक्ष स्थळ सर्वेक्षणाच्या या मोहिमेत श्रीगाव येथील स्वप्नील पाटील आणि प्रा. गीतांजली पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून, अशा दुर्लक्षित वास्तूंचे योग्य दस्तऐवजीकरण झाल्यास कोकणच्या सामाजिक आणि धार्मिक इतिहासाचे अनेक नवे पैलू उजेडात येऊ शकतील.
Rare inscription from 1898 found in Raigad.