मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यावर भर

चार दिवसांत पडताळणी पूर्ण करण्याचे आदेश

नाशिक : प्रतिनिधी
मतदार यादीतील डुप्लिकेट नावे आणि त्रुटी दूर करण्यासाठी पुढील चार दिवसांत फोटो सिमिलर एन्ट्रीजची शंभर टक्के पडताळणी पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले.
विविध राजकीय पक्षांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक संशयित नोंदीची काटेकोर तपासणी करून मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया मिशन मोडमध्ये राबविण्यात येणार आहे.
विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी अमित रंजन, महानगरपालिकेचे नोडल अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मधुमती सरदेसाई यांच्यासह संबंधित अधिकारी
उपस्थित होते.
जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले की, डुप्लिकेट मतदार नोंदी आढळल्यास संबंधित नोंदीसमोर  Already Enrolled at -C/Part/Sl. Number  अशी नोंद करावी. तसेच अनुपस्थित, स्थलांतरित किंवा मयत मतदारांची स्वतंत्र यादी तयार करून नियमानुसार त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्याची प्रक्रिया
पूर्ण करावी.
प्रत्येक बीएलओने दररोज किमान 200 गणना अर्जांचे डिजिटायझेशन करावे. त्याचबरोबर जमा होणार्‍या सर्व अर्जांचे त्याच दिवशी डिजिटायझेशन पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले. गृहनिर्माण संस्था, अपार्टमेंट आणि झोपडपट्ट्यांमध्ये प्रत्यक्ष गृहभेटी घेऊन मतदारांची माहिती अद्ययावत करण्यावर भर देण्याच्या सूचना करण्यात आल्या. मतदार यादी पुनरीक्षणात कोणताही हलगर्जीपणा सहन केला जाणार नसून, चुकीच्या कामासाठी संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांवर निवडणूक आयोगाकडून कारवाई होऊ शकते, असा इशाराही
जिल्हाधिकार्‍यांनी दिला.

जिल्हाधिकार्‍यांच्या महत्त्वाच्या सूचना
डुप्लिकेट मतदार नोंदींची चार दिवसांत शंभर टक्के पडताळणी.
प्रत्येक बीएलओने दररोज किमान 200 अर्जांचे डिजिटायझेशन करावे.
मयत, स्थलांतरित व अनुपस्थित मतदारांची स्वतंत्र यादी तयार करावी.
बीएलओंनी प्रत्यक्ष गृहभेटींवर भर द्यावा.
मतदार यादी शुद्धीकरणात हलगर्जीपणा करणार्‍यांवर कारवाई होणार.

Focus on rectifying errors in the electoral roll.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *